वेळोवेळी अनुभूती देऊन साधनामार्गावर टिकवून ठेवल्यामुळे श्री. सुधाकर नारायण पाध्ये यांनी परात्पर गुरुदेवांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !
साधनेच्या माध्यमातून आनंद देणार्या गुरुमाऊलीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्री. सुधाकर पाध्ये यांचा साधनाप्रवास त्यांच्याच शब्दांत येथे प्रसिद्ध करत आहोत. २७ फेब्रुवारी या दिवशी साधनेत आल्यावर त्यांच्यात झालेले पालट याविषयी पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.
भाग २.
भाग १. पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/454504.html
‘श्री. पाध्ये यांनी एवढेच कार्य केले नाही, तर त्यांची पत्नी सौ. अनघा पाध्ये आणि मुलगा श्री. नीलेश अन् सून सौ. जानकी, तसेच मुलगी सौ. केतकी साने या सर्वांना पूर्णवेळ साधक बनवले आहे ! यासाठी त्यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
६. परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत गोव्याला जाऊन आल्यावर पूर्णपणे कार्यात ओढला जाणे
परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत असतांना त्यांचा सर्व साधकांप्रती प्रेमभाव, काटकसर, वक्तशीरपणा आणि परिपूर्ण नियोजन या गोष्टींचा प्रभाव माझ्यावर झाला. त्या दौर्यानंतर मी पूर्णपणे कार्यात ओढला गेलो. सत्संग घेणे, प्रसार करणे, संस्थेचे साधक घरी आल्यावर त्यांच्या अल्पाहाराची आणि जेवणाची सोय करणे, यांतून मला पुष्कळ आनंद मिळत असे. आम्ही पनवेलमध्ये सत्संग घेण्यासाठी हातात फलक आणि इतर प्रसारसाहित्य घेऊन देवळात जायचो. तेव्हा पनवेलमधील तरुण ‘सनातनचे वेडे चालले’ असे म्हणत. तेव्हा आम्ही एवढे आनंदात असायचो की, आम्हाला त्याचे काहीच वाटत नसे.
७. प.पू. गुरुदेवांनीच समष्टीत आणणे
परात्पर गुरु डॉक्टर घरी आले असतांना म्हणाले, ‘‘तुमच्या स्वयंपाकघरातील कोणत्या डब्यात काय आहे, हे सर्व साधकांना ठाऊक होईल, तेव्हा ते खरे !’’ तेव्हापासून आम्ही आमचे घर सर्व साधकांसाठी येण्या-जाण्यासाठी मुक्तहस्ते उघडे केले. प.पू. गुरुदेवांनी आम्हाला खर्या अर्थाने समष्टीत आणले.
८. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘शिष्य’ ग्रंथ वाचायला सांगून शिकवणे
सत्संग घ्यायला लागल्यानंतर माझे मुंबई येथे पुष्कळ जाणे-येणे चालू झाले. त्या वेळी आपले नवीन ग्रंथ छापणे चालू झाले होते. नवीन ग्रंथांची प्राथमिक पाने सिद्ध व्हायची. शिष्य, शक्ती, गुरुकृपायोग, अशा अनेक ग्रंथांची पूर्व छपाईची पाने परात्पर गुरु डॉक्टर मला वाचायला देत असत. ‘शिष्य’ हा ग्रंथ छापून आला, त्याच दिवशी मी मुंबई येथील सेवाकेंद्रात गेलो होतो. परात्पर गुरु डॉक्टरांनी मला तो ग्रंथ वाचण्यास दिला. मी तो ग्रंथ वाचत असतांना एका पानावर लिहिले होते, ‘शिष्याने गुरूंसमोर आसंदीवर बसू नये.’ थोड्या वेळाने मला परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांच्या बाजूच्या सदनिकेत बोलावले. तेथे चार आसंद्या होत्या. एका आसंदीत परात्पर गुरु डॉक्टर, दुसर्या आसंदीत श्री. वटकरकाका (आताचे पू. वटकरकाका), तिसर्या आसंदीत सांगलीचे एक साधक आणि चौथी आसंदी रिकामी होती. परात्पर गुरु डॉक्टरांनी मला रिकाम्या आसंदीत बसण्यास सांगितले. तेव्हा मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांशी बसलो. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्याकडे कटाक्ष टाकला. त्या वेळी मला भान हरपल्यासारखे झाले.
९. परात्पर गुरु डॉक्टरांची पनवेल येथील जाहीर सभा, म्हणजे सेेवेची पर्वणीच !
१९९६ या वर्षी पनवेल येथे प.पू. गुरुदेवांची जाहीर सभा होती. त्या निमित्ताने सेवा करण्याची संधी मिळाली. संपूर्ण पनवेल शहरात सभेच्या प्रसाराच्या निमित्ताने भिंती रंगवण्यात आल्या होत्या. हे सर्व पाहून पनवेलकर आश्चर्यचकित होत होते. रायगड जिल्ह्यातील साधक रात्री या सेवेसाठी येत होते. काही साधक आमच्याकडेच रहाण्यासाठी असत. सभेच्या दिवशी प.पू. गुरुदेव आमच्याकडेच होते. ‘खरे गुरु कसे कार्य करतात ?’, याचे मूर्तीमंत उदाहरण मला पहायला मिळाले. पुष्कळ प्रकारची सेवा करायला मिळाली.
त्याच वर्षी सांगली येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार होता. त्यासाठी आठ दिवस आधी गुरुपौर्णिमेच्या सेवेसाठी सांगली येथे गेलो. प.पू. गुरुदेवांच्या कृपेने अनेक सेवा निर्विघ्नपणे पार पडल्या.
१०. प.पू. गुरुदेवांनी व्यावहारिक गोष्टीतही सहजतेने सांभाळून घेणे
‘गुरु आपल्याला कसे सांभाळून घेतात’, याचा अनुभव मला मी पूर्णवेळ होण्याआधी आला. माझ्या पुतणीचे लग्न होते. माझ्याकडे सकाळी ९.०० वाजता गुरुजींना आणण्याचे दायित्व होते; परंतु त्याच दिवशी परात्पर गुरुदेव मुंबईहून गोव्याला जाणार होते. मी त्यांना सकाळी ८.३० वाजता पनवेल एस.टी स्थानकाबाहेर महामार्गावर भेटणार होतो. त्यांना येण्यास विलंब झाला. माझ्या मनात ‘प.पू. गुरुदेवांना भेटल्याविना जायचे नाही’ असे होते. प.पू. गुरुदेव ९.०० वाजता आले. यात ‘मी गुरुजींना न्यायचे आहे’, हे विसरून गेलो. प.पू. गुरुदेव गोव्याला मार्गस्थ झाल्यावर मी गुरुजींना आणण्यास गेलो, तेव्हा त्यांना आधीच कुणीतरी घरी घेऊन गेले होते. व्यावहारिक गोष्टीही प.पू. गुरुदेव इतक्या सहजतेने सांभाळतात की, आपल्याला कोणताच त्रास होत नाही.
११. पोलिसांना ‘भ्रष्टाचारी दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन देव करणार आहे’, असे निर्भयपणे सांगता येणे
पनवेलमध्ये प्रसार करतांना पळस्पा फाटा येथे आमचे दत्त मंदिर आहे. त्याच्या बाजूला एक उपाहारगृह आहे. रविवारी तेथे पुष्कळ दाटी असायची. प्रसाराचा भाग म्हणून आम्ही मंदिराच्या जवळ ग्रंथ आणि उत्पादने यांचे वितरण करायचो. परात्पर गुरु डॉक्टर मुंबई ते गोवा प्रवास करतांना या केंद्रावर दोन वेळा थांबले होते. त्या केंद्रासमोर मुंबई-गोवा आणि मुंबई-पुणे महामार्ग एकमेकांस छेदतात. तेथे ‘आर.टी.ओ.’चे पोलीस गाड्यांची पडताळणी करत. एका रविवारी आम्ही वितरण कक्षावर सेवा करत असतांना एका जिज्ञासूला साधनेविषयी माहिती सांगत होतो. त्यांत ‘दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन कसे होणार आहे’, हा भाग सांगत होतो. हे सर्व ‘आर.टी.ओ.’चे पोलीस ऐकत होते. जिज्ञासू गेल्यावर ते दोघे आमच्याजवळ आले आणि त्यांनी विचारले, ‘‘मगाशी आपण काय सांगत होतात ?’’ तेव्हा मी पुन्हा त्यांना साधनेविषयी विस्तृत माहिती सांगितली. तेव्हा मी त्यांना निर्भयपणे सांगितले, ‘‘तुम्ही प्रतिदिन येथे उभे राहून ‘ट्रक’चालकांकडून पैसे घेता. आम्ही सामान्य माणसे काही करू शकत नाही; परंतु देव हे सर्व पहात असतो ना ! तो एकदाच असा फटका देतो. त्यातून तुम्ही वाचू शकत नाही.’’ तेव्हा ते थरथर कापू लागले. तेव्हा ‘देवाची क्षमता किती आहे’, याची त्यांना जाणीव झाली.
१२. पूर्णवेळ साधना करण्याचा विचार मनात येणे
साधनेला १ वर्ष झाल्यावर मी प.पू. गुरुदेवांना ‘पूर्णवेळ साधना करू का ?’, असे विचारले होते; परंतु तेव्हा त्यांनी थोडे दिवस थांबा’, असे सांगितले होते. साधना करून २ वर्षे झाल्यावर माझी घर, नातेवाईक यांची ओढ पुष्कळ अल्प झाली. २३.३.१९९७ या दिवशी मी पुन्हा तोच प्रश्न विचारल्यावर प.पू. गुरुदेवांनी लगेच ‘हो’ म्हणून सांगितले. माझी स्थिती प.पू. गुरुदेवांनाच ठाऊक होती. मी दुसर्या दिवशी स्वेच्छानिवृत्तीसाठी विनंतीपत्र (अर्ज) लिहून दिला. माझ्या वरिष्ठांनी मला समजावण्याचा पुष्कळ प्रयत्न केला; परंतु माझ्यावर कुठलाही परिणाम झाला नाही. मी स्वेच्छानिवृत्ती घेतली, हे कळल्यावर माझे भाऊ, बहिणी, जवळचे नातेवाइक आणि पनवेलमधील आमचे हितचिंतक यांनी दूरभाषद्वारे अन् प्रत्यक्ष भेटून मला समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे मी पूर्णवेळ साधना करू शकलो.
(क्रमश: उद्याच्या अंकात)
– श्री. सुधाकर नारायण पाध्ये, ढवळी, गोवा. (४.३.२०१९)
भाग ३. पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/455291.html
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |