‘अहमदनगर’चे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ करा !
होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह होळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नगर – राज्यात सध्या औरंगाबाद नामांतरणाचे सूत्र ऐरणीवर असतांना अहमदनगरचे नामांतर करून शहराला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ असे नाव देण्याची मागणी होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
६ वर्षांपूर्वी नागपूर येथे झालेल्या धनगर समाजाच्या मेळाव्यात नगर जिल्ह्याला अहिल्यादेवीनगर असे नाव द्यावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यादेवीनगर करण्याविषयी युती सरकार सकारात्मक आहे. नगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची सूचना चांगली आहे; मात्र त्याविषयी सर्व पक्षामध्ये मतैक्य होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रयत्न केले जातील’, असे सांगितले होते. त्या वेळी भाजप समवेत शिवसेना सत्तेत होती. या संदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी, ‘अशा मागण्या होतच असतात; पण औरंगाबादचे संभाजीनगर होणार हे नक्की’, असे ते म्हणाले.