(म्हणे) ‘सामाजिक संघटनांमध्ये सत्ता पालटण्याची ताकद यायला हवी !’ – मुक्ता दाभोलकर
सातारा, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – सद्यःस्थितीत पुरोगामी विचारांनी कार्य करणार्या संघटना सत्तेपर्यंत पोचू शकत नाहीत. त्यामुळे पुरागामी विचारांचे सरकार निर्माण होऊ शकत नाही; मात्र विशिष्ट एका समूहाचे हित केंद्रीत करून सत्तेच्या खुर्च्या मिळवत गेल्याने गोर-गरिबांचे, शेतकर्यांचे प्रश्न अधिकच जटील झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे शोषित अन् वंचित यांसाठी कार्य करणार्या सामाजिक संघटनांमध्ये सत्ता पालटण्याची ताकद यायला हवी, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केले.
(म्हणे) ‘ठराविक विचारसरणीच्या लोकांनीच विचारवंतांना नक्षलवादी ठरवून कारागृहात डांबण्याचे प्रकार चालू केले आहेत !’ – उल्हास पवार, काँग्रेस
या वेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार म्हणाले, ‘‘देशात विचारवंतांच्या हत्येचे सत्र चालू झाले. त्यामध्ये नरेंद्र दाभोलकर ते गौरी लंकेश या ५ विचारवंतांचे खूनी अद्याप सापडत नाहीत, ही शोकांतिका आहे. (केरळसह देशभरात अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या झाल्या. त्यांची हत्या करणारे आरोपी मोकाट आहेत. असे असतांना त्याविषयी काँग्रेसवाले बोलतील का ? – संपादक) तसेच हे सी.बी.आयचे अपयशच म्हणावे लागेल. आतापर्यंत झालेल्या विचारवंतांच्या हत्या हे ठराविक विचारसरणीच्या लोकांनीच केले असल्याचे स्पष्ट झाले आहे; मात्र आता त्या विचारधारेच्या लोकांनी हत्या करण्याचे मार्ग पालटून विचारवंतांना नक्षलवादी, देशद्रोही, आतंकवादी ठरवून त्यांना कारागृहात डांबण्याचे प्रकार चालू केले आहेत. याविरुद्ध संघटितपणे लढा देण्याची आवश्यकता आहे.’’