पंडित नथुराम गोडसे यांचे विचार लोकांपर्यंत पोचवण्याची शपथ घेणार्या हिंदु महासभेच्या माजी नगरसेवकाचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश !
राजकीय स्वार्थासाठी विचारांना तिलांजली देणारे असे राजकारणी लोकशाहीला बट्टा लावत आहेत. अशांना राजकारणात कायमस्वरूपी बंदी घालण्याचा कायदा करणे आवश्यक !
भोपाळ (मध्यप्रदेश) – हिंदु महासभेचे माजी नगरसेवक बाबूलाला चौरसिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. चौरसिया यांनी पूर्वी पंडित नथुराम गोडसे यांचा न्यायालयातील शेवटचा संदेश १ लाख लोकांपर्यंत पोचवण्याची शपथ घेतली होती; मात्र आता राज्यातील पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशाच्या वेळी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ उपस्थित होते. चौरसिया पूर्वी काँग्रेसमध्ये होते आणि त्यांनी पक्षाचा त्याग करून हिंदु महासभेत प्रवेश केला होता.
१. याविषयी ग्वाल्हेर येथील काँग्रेसचे आमदार प्रवीण पाठक यांनी म्हटले आहे की,
चौरसिया पूर्वी काँग्रेसमध्ये होते. आमचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या वडिलांच्या मारेकर्यांना क्षमा केली आहे. गांधी कुटुंब मोठ्या मनाचे आहे. त्यांच्या याच आदर्श मूल्यांमुळे आज गोडसे यांची पूजा करणारी व्यक्ती गांधी यांची पूजा करत आहे.
२. चौरसिया यांनी, ‘गोडसे यांना श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमात उपस्थित रहाण्यासाठी मला भाग पाडण्यात आले होते’, असा दावा केला. (भाग पाडण्याइतके चौरसिया लहान आहेत का ? – संपादक) मी काँग्रेसमध्ये याआधीही होतो. त्यामुळे मी कुटुंबात पुन्हा परतलो, असे त्यांनी म्हटले. (चौरसिया पुन्हा हे कुटुंब सोडून दुसरीकडे जाणार नाहीत, याची शाश्वती कोण देणार ? – संपादक)
३. यावर भाजपचे प्रवक्ते राहुल कोठारी यांनी म्हटले आहे की, कमलनाथ यांनी शिवराजसिंह चौहान यांना ‘तुम्ही गांधी यांच्यासमवेत आहात कि नथुराम गोडसेसमवेत ?’, अशी विचारणा केली होती, आता कमलनाथ यांनीच या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे.