‘इंडियन मुजाहिदीन’चा हात असल्याची शक्यता !
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांची गाडी सापडल्याचे प्रकरण
मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या १० पथकांद्वारे अन्वेषण चालू
मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कंबाला हिल येथील ‘अॅन्टिलिया’ या निवासस्थानाच्या बाहेर स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके आढळलेल्या प्रकरणाचे अन्वेषण मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग १० पथकांद्वारे करत आहे. या गाडीमध्ये एक बॅग आढळली असून त्यावर ‘मुंबई इंडियन्स अल’ असे लिहिले आहे. यावरून यामागे ‘इंडियन मुजाहिदीन’ या आतंकवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
१. २४ फेब्रुवारीच्या रात्री १ वाजता ही गाडी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील रस्त्यावर उभी करण्यात आली होती. रात्री १२.४० वाजता ही गाडी हाजीअली जंक्शन जवळ असल्याचे ‘सीसीटीव्ही’मध्ये आढळून आले आहे. या ठिकाणी ही गाडी १० मिनिटे उभी होती.
२. गाडी अॅन्टिलिया बाहेर लावल्यावर ‘सीसीटीव्ही’ चित्रणामध्ये दिसू नये म्हणून चालकाने गाडीच्या मागच्या दरवाजाने पलायन केले. मागील आठवड्यात ही गाडी विक्रोळी येथून चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती.
३. गाडीमध्ये बनावट (खोट्या) क्रमांकाच्या नंबर प्लेट मिळाल्या आहेत. त्यातील एक नंबर प्लेट ‘रिलायन्स इंडस्ट्रीज् लिमिटेड’ या नावाने नोंदवण्यात आली आहे.
४. वर्ष २०१३ मध्ये अंबानी यांच्या मरिन ड्राईव्हमधील कार्यालयात इंडियन मुजाहिदीनच्या एका आतंकवाद्याने धमकीचे पत्र पाठवले होते. पोलिसांनी केलेल्या अन्वेषणात मागील एक मासापासून अंबानी यांच्या घराची रेकी केली जात असल्याचे पुढे आले आहे.
५. गाडीत सापडलेल्या चिठ्ठीमध्ये ‘नीता भाभी आणि मुकेश भैया, ही तर झलक आहे. पुढच्या वेळी हे सामान पूर्ण होऊन येईल. संपूर्ण कुटुंबाला उडवण्याची व्यवस्था केली गेली आहे. काळजी घ्या’, असे लिहिण्यात आले आहे.
पोलिसांकडून विविध प्रकारे अन्वेषण चालू
या प्रकारानंतर अंबानी यांच्या घराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे. आजूबाजूच्या परिसरातील संशयित व्यक्तींची माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे. या प्रकरणी आतापर्यंत ९ जणांचे अन्वेषण करण्यात आले आहे. या भागातील ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्यांची पोलिसांकडून पडताळणी करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी ही गाडी उभी करण्यात आली होती, त्या ठिकाणच्या वाहतूक पोलिसांचेही अन्वेषण करण्यात येत आहे.