गुरुप्रतिपदेनिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आयोजित केलेले धार्मिक कार्यक्रम रहित : केवळ नित्य पूजा आणि आरती होणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचा निर्णय
अक्कलकोट – २८ फेब्रुवारी या दिवशी माघ वद्य प्रतिपदा (गुरुप्रतिपदा) आहे. या निमित्ताने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने प्रतिवर्षी शहरातून भजन, दिंड्यांसह सवाद्य निघणारा पालखी सोहळा आणि धार्मिक उत्सव साजरा करण्यात येतो; मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मंदिरातील सर्व धार्मिक कार्यक्रम रहित करण्याचा निर्णय मंदिर समितीच्या वतीने घेण्यात आला आहे. गुरुप्रतिपदेच्या दिवशी केवळ नित्य पूजा आणि आरती होऊन कार्यक्रमाची सांगता होईल, असे मंदिर समितीच्या वतीनेे स्पष्ट करण्यात आले आहे.
गुरुप्रतिपदेच्या दिवशी सकाळी ८.३० वाजता श्री ज्योतिबा मंडपात देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते पुरोहित मंदार महाराज आणि सहकार्यांच्या उपस्थितीत लघुरुद्र अभिषेक होईल. सकाळी ११.३० वाजता नैवेद्य आणि आरती होईल. या प्रसंगी बाहेरील भाविकांचा सहभाग असणार नाही. मंदिरात येणार्या भाविकांच्या माध्यमातून मंदिर, अक्कलकोट शहर आणि परिसर येथे कोरोनाचा संसर्ग बळावू नये, यासाठी मंदिर समितीच्या वतीने सर्व प्रकारच्या शासकीय नियमांचे पालन करण्यात येत आहे.