विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला देहली येथील शेतकरी आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न करणार्‍या ग्रेटा थनबर्ग हिला बोलावणार

देशातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणार्‍यांना कार्यक्रमाला बोलावण्यामागील आयोजकांचा हेतू काय आहे ? याची चौकशी व्हायला हवी. या प्रकरणी दोषी असणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी !

मुंबई, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – देहली येथील शेतकरी आंदोलनाच्या ‘टूलकिट’मध्ये पालट करून ते सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणार्‍या आंतरराष्ट्रीय पर्यावरणवादी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांना विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला बोलावण्यात येणार आहे. नाशिक येथे २५ आणि २६ मार्च या कालावधीत होणार्‍या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची माहिती देण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघात २६ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये विद्रोही चळवळीच्या अध्यक्षा प्रतिमा परदेशी यांनी ही माहिती दिली. या वेळी चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले, नाशिक येथील संमेलनाचे स्वागताध्यक्ष शशिभाऊ उनवणे आदी उपस्थित होते.

या वेळी प्रतिमा परदेशी यांनी चिपळूण येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात व्यासपिठावर भगवान परशुराम यांची प्रतिमा ठेवण्याविषयी कृती अयोग्य असल्याचे सांगितले. (कोकणभूमी ही भगवान परशुराम यांनी निर्माण केली असल्याने हिंदूंची आणि चिपळूणवासियांची त्यांच्यावर दृढ श्रद्धा आहे. याविषयी प्रतिमा परदेशी यांच्या पोटात दुखण्याचे कारण काय ? यातून एक प्रकारे परदेशी यांचा ब्राह्मणद्वेष आणि हिंदुद्वेषच दिसून येतो. – संपादक)

(म्हणे) ‘मोदी-शहा यांच्या मनुवादी राजवटीत मानवी मूल्यांना पायदळी तुडवले जात आहे !’ – प्रतिमा परदेशी

देशाच्या सीमेवर केली नाही, तशी कारवाई अहिंसक आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर केली जात आहे. रस्त्यात खिळे ठोकणे, खंदक खणणे अशा प्रकारे कारवाई करून सरकार आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना बसल्याजागी बंदीवान करत आहे. मोदी-शहा यांच्या मनुवादी राजवटीत मानवी मूल्यांना पायदळी तुडवले जात आहे. त्यांच्या राजवटीमध्ये राज्यघटनेने जनतेला दिलेले हक्क काढून घेण्याचे काम केले जात आहे. कोरोना महामारीमुळे जनता घरात बंद असतांना या हुकूमशाहीवादी सरकारने विद्यार्थीविरोधी नवे शैक्षणिक धोरण; आदिवासी, कामगार आणि शेतकरी यांच्या विरोधी कायदे करून त्याद्वारे जनविरोधी कृतींचा सर्वोच्च कहर दाखवला आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणार्‍यांना देशद्रोही ठरवले जात आहे.’’ (‘मनुवाद’ म्हणजे नेमके काय ? हे न सांगता सातत्याने अशा प्रकारे शब्द वापरून समाजात संभ्रम निर्माण करून हिंदुत्वनिष्ठांना मनुवादी ठरवायचे, हा पुरोगाम्यांचा कावा आहे. मोदी यांच्यावर टीका करतांना शेतकरी आंदोलनाला देशद्रोही शक्तींचा पाठिंबा मिळत असल्याविषयी मात्र प्रतिमा परदेशी गप्प का ? – संपादक)