कपडे कि विचार ?
काही जणांना नवनवीन कपडे खरेदीची पुष्कळ हौस असते. त्या कपड्यांतून कालांतराने ‘कपड्यांचे दुकान’ चालू करता येईल, अशी स्थिती होतेे. ही गंमत नाही, तर वस्तूस्थिती आहे. यामध्ये मी कुठे आहे, याचा विचार करूया. स्वतःच्या हातात अधिक पैसे असल्यावर त्यांचा उपयोग कसा होतो, याचे हे उदाहरण आहे.
‘साधी रहाणी उच्च विचारसरणी’, असे सुवचन आहे; मात्र त्याला छेद देत ‘उच्च रहाणी (हायफाय) साधे विचार’ या वाक्याला खतपाणी मिळेल, असेच अवतीभवती चालू असल्याचे लक्षात येते. नियमितपणे वेगळे कपडे पालटणे सहज शक्य असले, तरी अयोग्य विचार पालटणे सहज शक्य नाही. त्यासाठी पुष्कळ संघर्ष होतो. दूरचित्रवाणीवरील मालिका आणि देशातील अनेक पिढ्यांना चुकीची दिशा दाखवणारे ‘बॉलीवूड’ यांचा समाजमनावर पगडा आहे. त्यामुळे अनेकांचा आवडत्या कलाकारांसारखे कपडे खरेदी करण्याकडे कल असतो. बाजारातही तशाच प्रकारचे कपडे उपलब्ध असतात. हे त्यांच्या पथ्यावरच पडते. ते परिधान केल्यावर आपल्याला असे कपडे कसे वाटतात ? हे आरशासमोर उभे राहून पहाण्याचे कष्ट घेतले जात असतील का ? अन्य कुणीतरी तसे कपडे परिधान करत आहे; म्हणून मीसुद्धा तेच करणार, अशी वृत्ती यामागे असण्याची शंका नाकारता येत नाही.
प्रत्येक ‘मासा’ला कपडे खरेदी केलेच पाहिजेत का ? त्यांची आवश्यकता किती आहे ? हे कपड्यांची वारेमाप खरेदी करणार्यांना कळत नाही. ‘आता पुरे’, असे त्यांच्याच हिताचे सांगितल्यावर ‘आता ‘फॅशन’ करणार नाही, तर म्हातारपणी करणार का ? आमची ऊठबस चारचौघांत असते’, असे सांगतात. कपड्यांवरून इतरांशी स्पर्धा करण्याची मानसिकता प्रबळ असल्याने वर्षानुवर्षे केवळ नवनवीन कपडेच पालटलेे आणि विचार मात्र वर्षागणिक अधिक खालावत गेले. नवीन कपडे परिधान करणारा यशस्वी होतो आणि जुने पण स्वच्छ कपडे घालणारा मागे रहातो, असे ऐकिवात वा पहाण्यात नाही. उलटपक्षी गरीब परिस्थिती असूनही अभ्यास, काम यांकडे लक्ष केंद्रीत करून शिक्षण, नोकरी-व्यवसाय यांत यशाचे शिखर गाठता येते, हे अनेकांनी सिद्ध करून दाखवले आहे. नवीन कपड्यांपेक्षा प्रतिदिन नवीन (चांगले) विचार आत्मसात् केले, तर ते नक्कीच मार्गदर्शक ठरतील.
– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.