रामनाथी आश्रमातील साधकांना प्रेरणा देणाऱ्या अन्नपूर्णा कक्षात सेवा करणाऱ्या पूज्य रेखा काणकोणकर !
१. अहंभाव अल्प असल्याने सहसाधिकांना मोठेपणा देऊन त्यांना विचारून स्वयंपाक सिद्ध करणे
‘पू. रेखाताईंना चविष्ट आणि अप्रतिम स्वयंपाक बनवता येतो, तरीसुद्धा त्या ‘आमटी किंवा भाजी यांमध्ये किती तिखट -मीठ घालायचे ?’, हे त्यांच्यासमवेत असणार्या सहसाधिकांना विचारून घेतात. त्या एखादा पदार्थ बनवतांना सहसाधिकांना तो चवीसाठी देऊन ‘तो कसा झाला आहे ? त्यात काही न्यून तर नाही ना ?’, हे विचारून त्यानुसार त्यात सुधारणा करतात. ‘त्यांच्यात अल्प अहं असल्यानेच त्यांना स्वयंपाकातील सर्व ठाऊक असून आणि येत असूनही त्या विचारून घेऊन सेवा करतात’, असे मला वाटते.
२. सेवेत व्यस्त असतांनाही व्यष्टीचे प्रयत्न करणे
पू. रेखाताई सतत सेवा करत असतात. त्यांच्याकडे बघितल्यावर असे वाटते, ‘त्या देवाच्या अनुसंधानात असून देवाला विचारून सर्व काही करत आहेत.’ त्यांचा नामजपही सतत चालू असतो. त्या वेळ मिळाला की, लगेच सत्रे करतात. त्यांच्याकडे बघितल्यानंतर मलाही नामजप करण्याची जाणीव होते.
३. ‘साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, यासाठी त्यांच्या चुका सांगून अंतर्मुख करणे
पू. ताई तत्त्वनिष्ठ राहून साधकांना चुका सांगतात. एकदा पू. ताईंनी मला माझी चूक सांगितली. त्या वेळी मला ती स्वीकारता आली नाही. थोड्या वेळाने माझे चिंतन झाल्यावर मी त्यांच्याकडे क्षमायाचना करायला गेले. त्या वेळी पू. ताई म्हणाल्या, ‘‘मला सर्वांच्या प्रगतीच्या दृष्टीने जे चूक आहे, ते सांगावेच लागते. त्यातून माझी आणि समोरच्यांची साधना होणार आहे.’’
४. स्वतः वक्तशीर असून इतरांनाही वेळेचे पालन करण्यास उद्युक्त करणे
मला पू. रेखाताईंकडून वक्तशीरपणा हा गुण शिकता आला. त्या ठरलेल्या वेळेत स्वयंपाकघरात येतात. जेव्हा साधक सेवेसाठी विलंबाने येतात किंवा विलंबाने सेवा करतात, तेव्हा त्या त्यांना चुकीची जाणीव करून देतात. त्या प्रतिदिन ठरलेल्या वेळेत पटलावर महाप्रसाद ठेवतात, तसेच त्या विदेशी साधक आणि नागेशी येथील साधक यांना ठरलेल्या वेळेतच महाप्रसाद पाठवतात. या त्यांच्या कृतीतून त्या वेळेचे महत्त्व इतरांवरही बिंबवतात.
५. साधकांना दिलेल्या सेवेचा पाठपुरावा करून ती वेळेतच पूर्ण करून घेणे
अन्नपूर्णाकक्षात विविध सेवा असतात. पू. ताईंनी वेगवेगळ्या सेवांसाठी काही साधिकांची निवड करून त्यांना दायित्व दिलेले असले, तरीसुद्धा त्या ‘ती सेवा वेळेत पूर्ण होत आहे ना ?’, याचा पाठपुरावा घेतात. यामुळे आम्हालाही ‘सेवा वेळेत पूर्ण करायला हवी’, याची जाणीव होते. पू. ताई साधकांना छोट्या-छोट्या सेवांचे दायित्व देऊन त्या साधकाला परिपूर्णत्वाकडे घेऊन जातात.
६. ताण वा नैराश्य आलेल्या साधकांना साधनेसाठी प्रेरणा देणे
काही वेळा स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणार्या साधकांना कधी ताण येऊन ते निरुत्साही असल्याचे पू. रेखाताईंच्या लक्षात आल्यास त्या स्वतःहून ‘काय झाले ? बरा आहेस ना ?’, अशी त्या साधकांची आपुलकीने विचारपूस करतात. ‘पुन्हा प्रयत्न कर’, असे म्हणून त्या साधकांना प्रोत्साहन देतात. ‘आपण आढाव्यात सांगितलेली सूत्रे कृतीत आणली, तर आपल्याला निश्चित आनंद मिळणार’, असे सांगून त्यांना प्रेरणा देतात. त्यांच्याशी बोलल्यावर साधकांचा ताण नाहीसा होतो आणि मन हलके होते.
‘पू. रेखाताईंच्या रूपात साक्षात् अन्नपूर्णामातेने आम्हाला ही सेवा करण्याची संधी दिली आणि ती स्वतः आमच्या साधनेकडे लक्ष देत आहे’, याविषयी गुरुचरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
– कु. गुलाबी दीपक धुरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(१०.६.२०२०)