वेळोवेळी अनुभूती देऊन साधनामार्गावर टिकवून ठेवल्यामुळे श्री. सुधाकर नारायण पाध्ये यांनी परात्पर गुरुदेवांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !
‘श्री. पाध्ये यांनी एवढेच कार्य केले नाही, तर त्यांची पत्नी सौ. अनघा पाध्ये आणि मुलगा श्री. नीलेश अन् सून सौ. जानकी, तसेच मुलगी सौ. केतकी साने या सर्वांना पूर्णवेळ साधक बनवले आहे ! यासाठी त्यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
१. साधनेत येण्यापूर्वी
१ अ. सामाजिक कार्याची आवड : ‘मी एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत होतो. मला पहिल्यापासूनच हिंदु धर्माविषयी आवड होती आणि देवावर श्रद्धा होती; पण समाजात भोंदूबाबांची संख्या वाढत असल्यामुळे ‘कोणत्याही बाबांच्या मागे लागू नये’, असे मला वाटायचे.
१ आ. साधनेला विरोध असणे : वर्ष १९९४ मध्ये आमच्या घरी संत भक्तराज महाराज यांच्या भक्त मंडळींचा भजनाचा कार्यक्रम होत असे. त्यामध्ये माझी पत्नी सहभागी व्हायची. माझा या गोष्टीला प्रचंड विरोध होता. १९९५ या वर्षी प.पू. भक्तराज महाराज यांचा अमृत महोत्सव होता. या कार्यक्रमाला मी पत्नीला जाऊ दिले नाही.
२. अनुभूतींच्या माध्यमातून साधनेसाठी सकारात्मक होणे
२ अ. साधकांच्या आग्रहास्तव गुरुपौर्णिमा महोत्सवाला जाण्याची सिद्धता करणे, अंगात पुष्कळ ज्वर असल्याने पाणीही पिऊ शकत नसतांना भोजन प्रसाद म्हणून जेवू शकणे आणि याचे मनोमन आश्चर्य वाटणे :जुलै १९९५ मध्ये गुरुपौर्णिमा महोत्सव मासात मी पुष्कळ आजारी होतो. अंगात १०४ इतका ज्वर होता. त्याच वेळी कुडाळ येथे सनातन भारतीय संस्कृती संस्थेच्या वतीने संत भक्तराज महाराज यांचा गुरुपौर्णिमा महोत्सव होणार होता. संस्थेचे साधक आमच्याकडे यायचे. त्यांनी मला कुडाळ येथे गुरुपौर्णिमा उत्सवासाठी येण्याचा आग्रह केला. मी पत्नीला म्हणालो, ‘‘मी या कार्यक्रमाला जातो. तुझे बाबा (प.पू. भक्तराज महाराज) मला बरे करतील. मी जगलो नाही, तर तुझे साधक मला घरी पोचवतील.’’ आम्ही रात्रीच्या बसगाडीने कुडाळला जायला निघालो. तेव्हा मी पाणीही पिऊ शकत नव्हतो. अंगात ताप पुष्कळ होता आणि प्रचंड थकवाही होता. दुपारी १२ वाजेपर्यंत आम्ही कुडाळ येथे पोचलो. दुसर्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. दुपारचे जेवण तयार असल्याने ‘आम्ही सर्वांनी भोजन करून घ्यावे’, असे सांगण्यात आले. मला जेवणेही शक्य नव्हते. साधकांनी मला थोडा प्रसाद म्हणून ग्रहण करण्यास सांगितले. मी प्रसाद घेण्यास गेलो आणि सर्व भोजन व्यवस्थित जेवलो. कुठलाही त्रास झाला नाही. मला आश्चर्य वाटले. मला ‘हे कसे घडू शकते ?’, असा प्रश्न पडला.
२ आ. संत भक्तराज महाराज यांचे दर्शन होणे, भजनाला बसल्यावर ध्यान लागणे आणि भोजनगृहात सेवेला जाण्याविषयी कुणीतरी कानांत सांगत असल्याचे जाणवणे : गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला संत भक्तराज महाराज यांचे दर्शन झाले. मी त्यांच्यासमोर बसलो होतो. तेव्हा माझे तेथे ध्यान लागल्यासारखे झाले. मला कुणीतरी कानांत ‘इथे काय बसला आहेस ? भोजनगृहात सेवेसाठी सेवेकर्यांची आवश्यकता आहे’, असे सांगितल्याचे जाणवले. मला काहीच समजत नव्हते. मी उठलो आणि १ कि.मी. वर असलेल्या भोजनगृहापर्यंत धावत गेलो. मला एका सेवेकर्याने येथे आवश्यकता नसल्याचे सांगितले; परंतु एका वयस्कर व्यक्तीने मला स्वयंपाकघरात नेले. मी तेथे सायंकाळी ५ वाजेपर्यंत सेवा केली. माझ्यासाठी ही मोठी अनुभूती होती. ती माझ्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली.
२ इ. परात्पर गुरु डॉक्टरांची भेट : रात्री माझी आणि परात्पर गुरु डॉक्टरांची भेट झाली. परात्पर गुरु डॉक्टरांना पाहिल्यावर आणि त्यांचे बोलणे ऐकल्यावर ‘ही व्यक्ती काहीतरी पटण्यासारखे आणि शास्त्रीय भाषेत सांगत आहे’, यावर माझा पूर्ण विश्वास बसला.
३. साधनेला आरंभ
३ अ. परात्पर गुरु डॉक्टरांना भेटण्यासाठी मुंबई येथे जाण्याची ओढ लागणे : ही अनुभूतीची शिदोरी घेऊन मी पनवेलला आलो. परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेले नामजप लगेच चालू केले. त्यानंतर मला मुंबई येथे जाऊन परात्पर गुरु डॉक्टरांना भेटण्याची संधी मिळाली. ते मार्गदर्शन करत असतांना ‘तेथून हलूच नये’, असे वाटायचे. त्यांनी दिलेल्या प्रेमामुळे मला मुंबई येथे जाण्याची ओढच लागली.
३ आ. पनवेलमध्ये पहिला सत्संग चालू झाला : एकदा मी मुंबई येथे गेलो असता परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘पनवेलमध्ये सत्संग चालू करू शकतो का ? ते पहा.’’ मी म्हणालो, ‘‘मला अध्यात्मातील काहीच येत नाही. मी कसा सत्संग घेणार ?’’ त्यावर त्यांनी ‘प्रयत्न करा’, असे सांगितले. मी पनवेल येथील श्री रामदास मारुति मंदिराच्या विश्वस्तांना भेटून सत्संगासाठी जागेची अनुमती घेतली. मी आणि माझी पत्नी सत्संगाला येण्यासाठी लोकांना भेटत होतो. ‘सत्संगात कोणता विषय घ्यायचा ?’, हा प्रश्न होताच. मी परात्पर गुरु डॉक्टरांनी संकलित केलेला ग्रंथ घेतला होता. त्याचा अभ्यास चालू केला; परंतु ‘त्यातील भाग लोकांना कसा समजावून सांगायचा ?’, हे मला समजत नव्हते. पहिले ३ – ४ आठवडे सत्संगात कुणीच फिरकले नाही. काही दिवस केवळ मी आणि माझी पत्नी सत्संगात असायचो.
३ इ. सत्संगात येणार्या लोकांना आकर्षित करण्यासाठी हाताने पत्रके (पोस्टर) बनवणे : त्या वेळी मी अधिकोषात चाकरी करत होतो. मी ६ वाजता घरी आल्यावर चहा पिऊन लगेच सत्संगाचे निमंत्रण देण्यासाठी पत्नीच्या समवेत बाहेर पडायचो. मला लोकांना आकर्षित करण्यासाठी ‘हाताने पत्रके (पोस्टर) बनवूया’, असे सुचले. मी तसे बनवून परात्पर गुरु डॉक्टरांना दाखवत असे. ते त्याचे कौतुक करायचे आणि काही सुधारणा सुचवत असत. त्या वेळी प्रसारसाहित्यही उपलब्ध नव्हते.
४. अध्यात्मातील काहीही ज्ञान नसतांना केवळ प.पू. गुरुदेवांच्या कृपेनेच प्रवचने करता येणे
४ अ. सत्संगात ‘मी बोलत नसून परात्पर गुरु डॉक्टरच माझ्याकडून बोलवून घेत आहेत’, अशी श्रद्धा बळावणे : मी सत्संगामध्ये अभ्यास करून विषय घ्यायचो; परंतु जो विषय घ्यायचो, तो मला नंतर आठवत नसे. सर्व परात्पर गुरु डॉक्टरच माझ्याकडून करवून घेत असत. नंतर त्या सत्संगामध्ये ५० उपस्थिती असायची. त्यांच्या शंकांचे निरसन माझ्या बुद्धीला अशक्य होते. त्यामुळे माझी परात्पर गुरु डॉक्टरांवरील श्रद्धा अधिकच बळकट झाली. मी सत्संग घेतांना कुणीतरी वेगळी शक्तीच सत्संग घेत असल्याची अनुभूती नेहमी येत असे.
४ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले, ते ऐकले आणि रसायनी येथे अंबानी यांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दीड घंटा प्रवचन करणे : एकदा आम्हाला रसायनी येथे अंबानी यांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवचन घेण्यासाठी बोलावले होते. श्री. गडकरीकाका (आताचे पू. गडकरीकाका) प्रवचन करणार होते; परंतु त्यांना दुसरी सेवा आल्याने ते येऊ शकत नव्हते. परात्पर गुरु डॉक्टरांनी ते प्रवचन मला करण्यास सांगितले. मी म्हणालो, ‘‘मला मराठीमध्येही प्रवचन करणे जमत नाही, तर इंग्रजीत कसे प्रवचन घेणार ?’’ परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘बाबांचा (प.पू. भक्तराज महाराज यांचा) इंग्रजी भाषेतील शिकवण हा ग्रंथ वाचा.’’ मी तो ग्रंथ वाचला; परंतु मला काही लक्षात आले नाही. मी परात्पर गुरु डॉक्टरांना पुन्हा सांगितले, ‘‘मला काही सूत्रे तरी लिहून द्या.’’ ते म्हणाले, ‘‘तुम्ही प्रवचन घ्या. काही अडचण येणार नाही.’’ मी आज्ञापालन करण्याचे ठरवले. शाळेत गेल्यावर समोरच श्री गणपतीचे मोठे चित्र होते. मी गणपतीला नमस्कार केला. त्यानंतर मला अनेक नवीन गोष्टी सुचू लागल्या. तेथे मी दीड घंटा प्रवचन केले. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांना ते पुष्कळ आवडले. हे सर्व प.पू. गुरुदेवच करवून घेऊ शकतात.
५. परात्पर गुरु डॉक्टरांचा पनवेल येथे पहिला सत्संग
असेच दिनक्रम चालू असतांना एक दिवस परात्पर गुरु डॉक्टर आमच्याकडे येणार असल्याचा निरोप आला. ११.३.१९९५ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टर आमच्याकडे आले. रामदास मारुति मंदिर, पनवेल येथे परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग आयोजित केला होता. कार्यक्रमाला जिल्ह्यातील ७० साधक आले होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी मला विचारले, ‘‘मे मासात माझ्या समवेत गोवा येथे येणार का ?’’ मी लगेच ‘‘हो’’ म्हणालो.
(क्रमश: उद्याच्या अंकात)
– श्री. सुधाकर नारायण पाध्ये, ढवळी, गोवा. (४.३.२०१९)
भाग २. पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/454909.html
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |