स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार
१. पूर्वजांचे ज्ञान, पराक्रम आणि अभिक्रम यांचा अभिमान बाळगणे, हा परंपरेचा अभिमान असणे
‘पूर्वजांचे ज्ञान, पराक्रम आणि अभिक्रम यांचा अभिमान बाळगणे, हा खराखुरा पूर्वजांच्या परंपरेचा अभिमान बाळगणे होय. पूर्वजांच्या अज्ञानाच्या परंपरेचा अभिमान बाळगणे केव्हाही इष्ट नाही. पूर्वजांचे ज्ञान काही वेळा सध्याच्या वाढत्या ज्ञानाप्रमाणे अज्ञान ठरले असेल, तर ते स्वीकारता कामा नये, हे सावरकरांचे सूत्र !
२. राष्ट्रवादाची पुढची पायरी आंतरराष्ट्रवाद असून हिंदु राष्ट्र वादाची पुढची पायरी मानवतावाद असणे
‘सावरकर हे राष्ट्रवादी होते; पण त्यांनी आंतरराष्ट्रवादाचा कधी विचारच केला नाही का ?’, असा प्रश्न बर्याच वेळा उपस्थित होतो. ‘राष्ट्रवादाची पुढची पायरी आंतरराष्ट्रवाद आहे. हिंदु राष्ट्र वादाची पुढची पायरी मानवतावाद आहे’, असे सावरकर म्हणतात; पण ‘जगावर दुसर्या ग्रहावरून आक्रमण झाल्याविना आंतरराष्ट्रवाद येणार नाही’, असे त्यांचे निश्चित मत आहे. याचे कारण समान दुःख आल्याविना जगाचे एक राष्ट्र कधीही होणार नाही. आंतरराष्ट्रवादाची भाषा बोलणारी राष्ट्रे दुसर्या महायुद्धानंतर आणि गेल्या २ – ३ दशकांत अधिक कट्टर राष्ट्रवादी बनलेली आहेत.
३. गोपालनाचे महत्त्व पटवून देणे
‘गोपालन झाले पाहिजे’, हे सावरकरांच्या गायीसंबंधातील विवेचनाचे मुख्य सूत्र होय ! गायीचाही विचार त्यांनी बुुद्धीवादाच्या दृष्टीकोनातून केला.
४. उद्योगालयाला लाभ झाल्यास त्याचा वाटा लाभांशाच्या रूपाने कामगारांना मिळतो; पण हानी झाल्यास त्याचाही वाटा कामगारांनी उचलला पाहिजे !
उद्योगालयाला (कारखान्याला) पैशांप्रमाणे कामगारांच्या श्रमाचेही भांडवल लागते, हे तत्त्व सावरकरांना मान्य आहे. त्यामुळे कामगारांचे प्रतिनिधी उद्योगालयाच्या संचालक मंडळावर असतात. उद्योगालयाला लाभ होतो, त्याचा वाटा लाभांशाच्या रूपाने कामगारांना मिळतो; पण हानी झाली, तर त्याचाही वाटा कामगारांनी उचलला पाहिजे आणि उद्योगालयाचे पर्यायाने राष्ट्राचे हित साधले पाहिजे.
५. ‘मुसलमान आणि इंग्रज यांची आक्रमणे ही केवळ राजकीय नसून सांस्कृतिक आक्रमणेही होती’, असे सावरकरांचे विचार असणे
भारतावर यवन, ग्रीक, शक, हूण, मुसलमान आणि इंग्रज यांनी जी आक्रमणे केली, त्यांपैकी पहिली ४ आक्रमणे ही केवळ राजकीय होती. ‘उरलेली २ म्हणजे मुसलमान आणि इंग्रज यांची आक्रमणे ही केवळ राजकीय नव्हे, तर सांस्कृतिक आक्रमणेही होती’, हा मोलाचा सिद्धांत सावरकरांनी त्यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथात मांडला. मुसलमान आणि इंग्रज या आक्रमकांना भारतात राजकीय सत्ता राबवतांना भारतातील संस्कृती, धर्म, कला अन् भाषा इत्यादी समाजाची अस्मिता नष्ट करावयाची होती. समाजातील दोषांचा लाभ उठवून हिंदूंना बाटवून हिंदूंची संख्या न्यून करावयाची आणि आपल्या समाजाची संख्या वाढवायची, असा उपक्रम मुसलमान अन् इंग्रज म्हणजेच ख्रिस्ती यांनी चालू केला. एका विचारवंतानेे ख्रिस्त्यांच्या या उपक्रमाचे मार्मिक वर्णन चांगल्या पद्धतीने केले आहे. ‘ख्रिस्ती येथे आले, तेव्हा त्यांच्या हातात बायबल नि आमच्या हातात सत्ता होती. आता आमच्या हातात बायबल नि ख्रिस्त्यांच्या हातात सत्ता आहे.’
– प्रभाकर नी. नवरे (स्वातंत्र्यवीर, दिवाळी २०११)