राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून वैदिक, वैष्णव, शाक्त किंवा शैव परंपरेतील सन्माननीय व्यक्तीची नियुक्ती करावी ! – साधू-महंतांची राज्यपालांकडे मागणी
मुंबई – सांस्कृतिक मंत्रालय मंत्री तथा राज्यमंत्री किंवा राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून वैदिक, वैष्णव, शाक्त किंवा शैव परंपरेतील सन्माननीय व्यक्तीची नियुक्ती करावी, अशी मागणी साधू-महंतांनी राज्यपालांकडे केली आहे. त्यांनी राजभवनावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
या वेळी महंत श्री मंडलेश्वर स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज म्हणाले की, साधू-महंतांच्या या भूमीला समाजसुधारणेचे आशीर्वाद लाभले आहेत, हे नाकारून चालणार नाही. भारतात कायदेमंत्री हे कायदेपंडित आहेत, आरोग्यमंत्री डॉक्टर आहे, तसेच क्रीडा क्षेत्रात भरीव कामे व्हावीत; म्हणून सचिन तेंडुलकर यांना राज्यसभेवर प्रतिनिधित्व दिले होते. आमची मागणी एवढीच आहे की, भारतीय संस्कृतीचे रक्षण, वाढ आणि उद्धार यांसाठी महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात सांस्कृतिक मंत्री किंवा राज्य मंत्री म्हणून संस्कृती जाणणार्या-जपणार्या व्यक्तिमत्त्वास स्थान द्यावे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही कुंभनगरी आहे. येथे संस्कृत विश्वविद्यालय व्हावे, अशाही मागणी या वेळी करण्यात आल्या.
या वेळी भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले, मंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद महाराज उपस्थित होते.