पुणे महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार !
पुणे येथील एकाच रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे कार्यादेश २ ठेकेदारांना दिले
पुणे – येथील सुखसागर परिसरात एकाच रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे २ स्वतंत्र कार्यादेश (वर्कऑर्डर) २ वेगवेगळ्या ठेकेदारांना महापालिका प्रशासनाने दिले. प्रत्यक्ष काम चालू करतांना हा प्रकार लक्षात आल्याने महापालिकेच्या अजब आणि मनमानी कारभाराची चर्चा होत आहे. हे प्रकरण महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी समजावून घेत संबंधित शाखा अभियंत्याला नोटीस बजावून खुलासा मागितला असल्याचे समोर येत आहे.
विकासाची स्पर्धा शिगेला! पुण्यात एकाच रस्त्यासाठी दोन ‘वर्क ऑर्डर’https://t.co/Ib89GLTlyX #Pune #PuneMunicipalCorporation
— Maharashtra Times (@mataonline) February 25, 2021
महापालिकेला प्रत्यक्षात जेथे काम करावयाचे आहे, तेथील अक्षांश, रेखांक्ष निविदेमध्ये सादर करावे लागतात; मात्र काही नगरसेवकांच्या दबावातून, काही प्रसंगी अन्य लाभातून अभियंत्यांकडून निविदेत तरतुदी नमूद न करताच कामाचे कार्यादेश दिले जातात. त्यातून महापालिकेच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे. पालिकेतील ठेकेदार हे बहुतांश नगरसेवक असल्याचे दिसून येते. या नगरसेवकांच्या स्पर्धेत नागरिकांनी कररूपाने भरलेल्या लाखो रुपयांचा महापालिका प्रशासन अपव्यय करत असल्याची चर्चा होत आहे. (नागरिकांचा कररूपाने भरलेल्या पैशांचा अशाप्रकारे अपव्यय करण्याचा प्रशासनाला काय अधिकार आहे ? – संपादक)