महाराष्ट्रातील प्रवाशांना कोरोना चाचणी अहवाल अनिवार्य; परंतु कर्नाटकच्या बसगाड्यांचा महाराष्ट्रात मुक्त वावर
कोल्हापूर – कोरोना पडताळणी अहवाल असल्याविना कर्नाटकात महाराष्ट्रातील बस प्रवाशांना प्रवेश रहित करण्यात आला आहे; परंतु कर्नाटकातील बसगाड्यांनी महाराष्ट्र हद्दीत प्रवेश करत पुण्यापर्यंत बस फेर्या चालवल्या आहेत. त्यातून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचा अंदाजे १० लाखांचा महसूल बुडाला आहे. कर्नाटक प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे महाराष्ट्राच्या बस प्रवाशांना कर्नाटक प्रवेश बंद, तर कर्नाटकच्या प्रवाशांना मात्र महाराष्ट्रात प्रवेश खुला, असे परस्परविरोधी चित्र आहे. आता २५ फेब्रुवारीपासून कर्नाटकातील बसगाड्यांना येथील बसस्थानकात प्रवेश नाकारण्यात आला आहे. असे असतांना कर्नाटकच्या गाड्यांनी महाराष्ट्रातील प्रवाशांना घेऊन त्यांना कोल्हापूर शहरात कावळा नाका येथे सोडून किंवा राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना सोडून महसूल जमा करण्याचा सपाटा लावला आहे.