जालना येथे दळणवळण बंदी नाही; पण कठोर निर्बंध लागू !
जालना – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी २३ फेब्रुवारी या दिवशी आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या संमतीने काही निर्णय घेण्यात आले. यामध्ये ३१ मार्चपर्यंत इयत्ता १० वी आणि १२ वीच्या शाळा वगळता इतर शाळा, वसतीगृहे, शिकवणीवर्ग, यात्रा, आठवडी बाजार, मोर्चे, आंदोलने हे सर्व बंद रहाणार आहे. शाळा, शिकवणी वर्ग आणि महाविद्यालये जरी बंद असली, तरी शिक्षकांना मात्र शाळेत जाऊन आपले कर्तव्य पार पाडावे लागणार आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी बिनवडे म्हणाले की, कोरोना रुग्णांचा प्रसार करणार्या महत्त्वांच्या माध्यमांमध्ये व्यापारी, भाजीविक्रेते, रिक्शाचालक यांचा समावेश आहे. त्यामुळे अशा ‘सुपर स्पेडर’ची टेस्टिंग’ वाढवण्यावर भर देण्यात येईल. विदर्भामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. विदर्भाला जोडून जालना जिल्ह्याचा भोकरदन आणि जाफराबाद हा भाग येतो. त्यादृष्टीने काळजी घेण्यासाठी हे निर्णय घेण्यात आले आहेत. नगरपालिकेच्या वतीने पथक स्थापन करून शहरात आणि जिल्ह्यात ‘मास्क’ वापरण्याची कठोर कार्यवाही करण्यात येईल.