पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात गलिच्छ राजकारण झाले ! – वनमंत्री संजय राठोड
यवतमाळ, २३ फेब्रुवारी (वार्ता.) – पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात गलिच्छ राजकारण झाले, अशी प्रतिक्रिया राज्याचे वनमंत्री आणि शिवसेनेचे संजय राठोड यांनी २३ फेब्रुवारी या दिवशी पोहरादेवीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांना दिली. या प्रकरणावर राठोड यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली. या वेळी ते म्हणाले, ‘‘पूजा चव्हाण हिच्या मृत्यूने संपूर्ण बंजारा समाजाला दुःख झाले आहे. आम्ही चव्हाण कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत; मात्र या मृत्यूवरून चालू असलेले राजकारण निंदनीय आहे. मी ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. माझे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा घाणेरडा प्रयत्न झाला आहे. सामाजिक माध्यमांतून पसरणार्या गोष्टी तथ्यहीन आहेत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. चौकशीतून सत्य बाहेर येईल. माझी, माझ्या कुटुंबाची आणि माझ्या समाजाची अपकीर्ती करू नका.’’
१० दिवसांपासून मी अलिप्त होतो. या काळात मी माझे आई-वडील, पत्नी आणि मुले यांना सांभाळण्याचे काम करत होतो, तसेच शासकीय कामही मुंबईतून चालू होते. आज जगदंबामाता आणि संत सेवालाल महाराज यांचे दर्शन घेऊन पुन्हा एकदा कामाला प्रारंभ करणार आहे, असे सांगत राठोड यांनी अप्रत्यक्षपणे राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले.