यजमानांना ‘कोरोना विषाणू’चा संसर्ग झाल्यानंतर सौ. भक्ती भिसे यांना आलेले अनुभव आणि त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा !
१. ‘यजमानांना कोरोना झाला आहे’, हे सत्य स्वीकारता न आल्याने मनात पुष्कळ नकारात्मक विचार येऊन भीती आणि असुरक्षितता वाटणे
‘९.७.२०२० या दिवशी माझे यजमान श्री. नित्यानंद यांची ‘कोरोना विषाणू’चाचणी करण्यात आली. चाचणीच्या अहवालानुसार त्यांना ‘कोरोना’ झाल्याचे समजले. तेव्हापासून माझ्या मनात पुष्कळ नकारात्मक आणि भीतीचे विचार वाढले. जेव्हा त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले, तेव्हा माझ्या मनात भीतीचे विचार आणखी वाढून मला असुरक्षितता वाटू लागली. त्या वेळी ‘यजमानांना कोरोना झाला आहे’, हे सत्य मला स्वीकारता येत नव्हते.
२. देव आणि संत यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन
२ अ. आपत्काळातील हा प्रसंग शिकण्यासाठी दिला असून पुढे अशा प्रसंगांमध्ये मनाची स्थिरता ठेवायची असल्याचे देवाने मला सांगणे : त्याच दिवशी संध्याकाळी मी आणि माझी मुलगी दुर्वा (वय साडे तीन वर्षे) (वर्ष २०१८ मध्ये चि. दुर्वा हिची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के घोषित करण्यात आली होती.) दोघींनी नेहमीप्रमाणे आरती केली. त्यानंतर मी श्रीकृष्णाशी बोलू लागले, ‘इतरांना हा रोग होत नाही. मग आपल्याच घरात हा कसा आला ?’ तेव्हा ‘हा आपत्काळ आहे. या आपत्काळात हा प्रसंग तुला शिकण्यासाठी दिला आहे. पुढे अशा प्रसंगांमध्ये मनाची स्थिरता ठेवायची आहे’, असे देवाने मला सूक्ष्मातून सांगितले.
२ आ. हा प्रारब्धाचा भाग असून गुरु प्रारब्धाची तीव्रता न्यून करत असल्याने अधिकाधिक नामजप करून अनुसंधानात रहाण्यास पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी सांगणे : त्यानंतर पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा मला दूरभाष आला. त्यांनी सांगितले, ‘‘हा प्रारब्धाचा भाग असून गुरु प्रारब्धाची तीव्रता न्यून करतात. तेव्हा तू अधिकाधिक नामजपादी उपाय कर अन् गुरुदेवांशी सूक्ष्मातून बोल.’’ अशा प्रकारे त्यांनी मला गुरुदेवांच्या सतत अनुसंधानात रहाण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी प्रयत्न केल्यावर २ दिवस माझ्या मनात भीतीचे विचार आले नाहीत.
३. शेजारी आणि नातेवाईक यांच्याकडून ‘तुम्हाला कोरोनाची लक्षणे आहेत का ?’, अशी विचारणा झाल्यानंतर मनाची अस्वस्थता वाढून ताण येणे आणि ‘त्याविषयी चाचणी करूया’, असे दिरांनी सांगितल्यावर मनातील विचार थांबणे
त्यानंतर ३ दिवसांनी आमचे शेजारी आणि नातेवाईक ‘तुम्हाला कोरोनाची लक्षणे आहेत का ? तुमची चाचणी केली का ?’, असे प्रश्न विचारू लागले. अशी चौकशी अनेकजण करू लागल्यामुळे पुन्हा माझ्या मनात भीतीचे विचार येऊ लागले. आता ‘माझ्या मनात मला अन् दुर्वालाही कोरोना झाला कि काय ?’, असे विचार येऊन माझ्या मनाची अस्वस्थता वाढली आणि मला ताण येऊ लागला. त्या वेळी माझे विचारांचे प्रमाण पुष्कळ वाढले होते. तेव्हा ‘याविषयी साधकांशी बोलून घ्यावे. आवरण काढावे किंवा हे विचार कागदावर लिहून तो कागद जाळावा’, अशा प्रकारचे कोणतेही विचार मला सुचत नव्हते. त्यानंतर मी दिरांशी बोलल्यावर त्यांनी ‘आपण चाचणी करूया’, असे सांगितले. तेव्हा माझ्या मनातील विचार थांबले.
४. साधक, वसाहतीतील लोक आणि नातेवाईक यांनी केलेले साहाय्य
४ अ. साधकांनी नामजपादी उपाय करण्यास सांगून सतत अनुसंधान वाढवण्यास सांगणे : साधक वारंवार संपर्क करून आमची विचारपूस करत होते. त्यानंतर मी साधकांनी सांगितल्याप्रमाणे मनातील सर्व विचार लिहून काढले आणि तो कागद अग्नीत विसर्जित केला. दुसर्या दिवसापासून मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र सतत समवेत ठेवले. मी त्यांच्याशी सूक्ष्मातून बोलणे चालू केले. त्यामुळे मला त्यांच्या अनुसंधानात सतत रहाता येऊ लागले.
४ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच वसाहतीतील लोकांनी साहाय्य करण्याची सिद्धता दर्शवून धीर देणे : श्री. नित्यानंद यांना रुग्णालयात भरती केल्यापासून वसाहतीतील (सोसायटीतील) अनेक जणांनी दूरभाष करून सांगितले, ‘तुम्ही काळजी करू नका. काहीही हवे असेल, तर आम्हाला कळवा. आम्ही साहाय्य करू.’ सध्या समाजात कोरोनाच्या रुग्णाच्या कुटुंबियांना बहिष्कृत केले जात असल्याची अनेक उदाहरणे आढळून येत असतांना आम्हाला मात्र परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने लोकांचे सकारात्मक वागणे अनुभवण्यास मिळाले.
४ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रासमोर मनातील विचार सांगण्यास बहिणीने सांगणे : त्या रात्री मला माझी आई (श्रीमती सुनंदा काते) आणि ताई (सौ. शोभा नटे – सौ. भक्ती यांची मोठी बहीण. आई आणि बहीण दोघीही साधिका आहेत.) यांचा दूरभाष आला होता. तेव्हा मी त्यांना आम्ही कोरोनासंदर्भात चाचणी करणार असल्याविषयी कळवले. त्या वेळी ‘‘तुम्हाला जर तुमच्यात ‘कोरोना विषाणू’ची लक्षणे दिसत नसतील, तर तुम्ही चाचणी का करत आहात ? परात्पर गुरुदेव आहेत ना ! ते तुमचा सांभाळ करत आहेत. तू त्यांनाच तुझे सर्व विचार का सांगत नाहीस आणि असे नकारात्मक विचार करण्याऐवजी परात्पर गुरुदेवांच्या अनुसंधानात का रहात नाहीस ? तू परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र समोर ठेवून त्यांना सर्व विचार सांग’’, असे माझ्या बहिणीने मला सांगितले.
५. ‘स्वतःला ‘कोरोना विषाणू’चा संसर्ग झाला असल्याविषयीचे आणि अन्य सर्व विचार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रासमोर बसून त्यांना सांगत असतांना ‘आई, डॉक्टरबाबा आले बघ !’’ असे मुलीचे उद्गार ऐकू येणे आणि ते ऐकताच मनातील सर्व विचार थांबणे
मी परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र घेतले आणि रात्री २० मिनिटे त्यांना माझ्या मनात निर्माण झालेले एकटेपणा, असुरक्षितता आणि भीती यासंबंधीचे विचार, तसेच ‘आम्हाला कोरोना विषाणू’चा संसर्ग झाला असल्याच्या विषयीची भावना’, असे सर्व विचार त्यांना सांगितले आणि मी त्यांच्या छायाचित्रासमोर रडले. तेव्हा माझी मुलगी चि. दुर्वा अचानक म्हणाली, ‘‘आई, डॉक्टरबाबा आले बघ !’’ तिचे हे उद्गार ऐकताच माझ्या मनातील विचार क्षणार्धात थांबले. ‘परात्पर गुरु डॉक्टर आपल्यासमवेत आहेत आणि ते आपले रक्षण करतच आहेत’, अशी माझी श्रद्धा आणि विश्वास वाढला. काही क्षणांपूर्वी असलेली अस्वस्थता, नकारात्मकता आणि एकटेपणा दूर होऊन मला अचानक धैर्य आले. ‘परात्पर गुरु डॉक्टर कशा प्रकारे आपला सांभाळ करत आहेत’ , हे माझ्या लक्षात आले.
६. या कालावधीत जेवणही न्यून होणे आणि त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनीच ‘हा आश्रमातील महाप्रसाद आहे’, असा भाव ठेवून अन्न ग्रहण करण्यास सूक्ष्मातून सांगणे
या कालावधीत माझे जेवणही न्यून झाले होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनीच ‘हा आश्रमातील महाप्रसाद आहे’, असा भाव ठेवून ‘अन्न ग्रहण कर’, असे सूक्ष्मातून सांगितले. त्यानंतर मला जेवण जाऊ लागले आणि माझ्या भावजागृतीच्या प्रयत्नांतही वाढ झाली.
७. चि. दुर्वाच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी काळजी घेणे
७ अ. दुर्वाच्या सहज बोलण्याने सकारात्मक रहाता येणे : श्री. नित्यानंद रुग्णालयात गेल्यानंतर मला जेव्हा जेव्हा शेजारचे किंवा नातेवाईक यांचे दूरभाष येत होते, तेव्हा मला रडू येत होते. ते पाहून एकदा दुर्वा अचानक म्हणाली, ‘‘आई, तू सारखी सारखी का रडतेस ? देवाला आपली काळजी आहे’’, असे बोलून ती खेळू लागली. तिच्या बोलण्याने मला काही काळ सकारात्मक वाटले.
७ आ. दुर्वाने नामजपादी उपाय करण्यास सांगणे : मनातील नकारात्मक विचारांमुळे मला ‘काही करू नये’, असे वाटायचे. मला सतत कंटाळवाणे वाटत होते. त्या वेळी दुर्वा मला ‘आई, नामजप कर’, असे म्हणत असे. ती कापूर आणून मला उपाय करायला सांगत असे.
७ इ. दुर्वाने श्रीकृष्णाजवळ ‘बाबांना लवकर बरे वाटू दे, ते लवकर घरी येऊ देत’, अशा प्रार्थना करून त्याला आळवल्याचे जाणवणे : नातेवाइकांचा दूरभाष आल्यावर, ‘बाबा बरे आहेत. ते लवकर बरे होऊन घरी येणार आहेत’, असे दुर्वा सर्वांना सांगत असे. प्रतिदिन संध्याकाळी आरती केल्यानंतर दुर्वा ‘श्रीकृष्ण बाप्पा, माझ्या बाबांना लवकर बरे वाटू दे. ते लवकर घरी येऊ देत. आम्हाला आश्रमबाप्पामध्ये (दुर्वा देवद आश्रमाला ‘आश्रमबाप्पा’ म्हणते.) जाता येऊ दे’, अशा प्रार्थना करत असे.
८. श्री. नित्यानंद यांना ताप येण्यापूर्वी ‘कोरोना झालाय, कोरोना झालाय’, असे दुर्वाच्या वारंवार बोलण्यातून ती पूर्वसूचना असल्याचे लक्षात येणे
श्री. नित्यानंद यांना ताप येण्याच्या आदल्या दिवशी दुर्वा तिच्या आत्याशी बोलतांना ‘कोरोना झालाय, कोरोना झालाय’, असे वारंवार म्हणत होती. तेव्हा मी तिला रागावले होते; परंतु ‘दुर्वाला मिळालेली ती पूर्वसूचना होती’, हे माझ्या नंतर लक्षात आले.
९. श्री. नित्यानंद यांना ताप आल्यानंतर त्यांना ठेवलेल्या खोलीत चि. दुर्वाला ‘जाऊ नको’, असे सांगितल्यावर तिने न जाणे
श्री. नित्यानंद यांना ज्या दिवशी ताप आला, तेव्हापासून ते स्वतंत्र खोलीत एकटे राहू लागले. आम्ही दोघी बाहेरील खोलीत राहू लागलो. त्या दिवशी मी दुर्वाला ‘त्या खोलीत जायचे नाही’, असे सांगितले. ताप आल्यापासून ७ दिवस श्री. नित्यानंद त्या खोलीत होते. त्यानंतर रुग्णालयामध्ये भरती झाले. त्यानंतर ती खोली ‘सॅनिटाईझ’ केली. ते रुग्णालयात असेपर्यंत ती खोली बंद होती. दुर्वाही त्या खोलीत जात नसे.
१०. श्री. नित्यानंद यांचा विलगीकरण कालावधी संपण्याच्या आदल्या दिवशी बाबांना पाहून ‘‘तुम्ही माझ्याशी कधी खेळणार ?’’, असे विचारणे
श्री. नित्यानंद घरी आल्यावर पुन्हा १४ दिवस त्या खोलीत एकटे रहात होते. अशा प्रकारे संपूर्ण १ मास (महिना) आमच्यासाठी ती खोली बंद होती. त्या कालावधीत दुर्वाने त्या खोलीत जाण्याचा कधीच हट्ट केला नाही. श्री. नित्यानंद घरी आल्यावर १४ दिवस विलगीकरणात होते. ते केवळ प्रसाधनगृहात (शौचालय किंवा अंघोळ) जाण्यासाठी बाहेरच्या खोलीत येत होते. तेव्हा दुर्वा त्यांना ‘बाबा, लगेच खोलीत जा. लांब रहा. जवळ येऊ नका’, असे म्हणत असे; मात्र १४ दिवस संपण्याच्या आदल्या दिवसापासून ‘बाबा, तुम्ही बाहेर कधी येणार ? माझ्याशी कधी खेळणार ?’, असे ती म्हणू लागली.’
– सौ. भक्ती नित्यानंद भिसे, देवद गाव, पनवेल (८.८.२०२०)
|