सनातनद्वेषी बाबा आढाव !
आकाशवाणीवर होणार्या ‘चिंतन’ या कार्यक्रमाचे वावडे आता कामगार नेते बाबा आढाव यांना वाटू लागले आहे. न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाच्या वेळी याविषयी मुक्ताफळे उधळतांना ते म्हणाले, ‘‘सरकार या माध्यमातून सनातनी विचार समाजात पोचवत आहे. सरकारने राज्यघटनेतील विचार समाजापर्यंत पोचवले पाहिजेत.’’ हिंदुद्वेष नसानसांत भिनल्यावर हे साम्यवादी तारतम्यही कसे हरवून बसतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. याऐवजी बायबल किंवा कुराण यांच्याविषयीचा कार्यक्रम प्रसारित होत असता, तर आढाव यांना काही आक्षेपार्ह वाटले नसते. उलट ‘घटनेनुसार ‘निधर्मी’ कार्यक्रम चालू आहे’, असे त्यांना वाटले असते. खरेतर सनातन धर्म हा विश्वातील प्रत्येकच माणसाच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीशी निगडित असल्याने त्याला कुणीही मानवी जीवनापासून वेगळे करू शकत नाही. जिथे आणि जेव्हा कोणताही माणूस मूळ सनातनी धर्माच्या विचारांपासून दूर गेलेला असतो, तिथे तो मानव आणि समाज यांच्या हिताच्या दृष्टीने अयोग्यच वागत असतो. पहाटे जाग आल्याच्या क्षणापासून ते रात्री झोपेपर्यंत, जन्मापूर्वीपासून ते मृत्यूनंतरही आणि क्षणापासून व्यापक कालचक्रापर्यंत सनातन हिंदु धर्माने अथांग, अखंड आणि अव्याहतपणे मानवासह ब्रह्मांडाला व्यापलेले आहे. हे झापडे लावून संकुचित झालेल्या साम्यवाद्यांना कळण्याएवढी त्यांची पात्रता नाही; पण म्हणून जळी, स्थळी हिंदुद्वेषी विधाने करून समाजाची दिशाभूल करण्याचे स्वातंत्र्य त्यांनी घेणे कदापि योग्य ठरणार नाही.
सनातन संस्कृतीची आवश्यकता !
‘टी.आर्.पी.’साठी का होईना, दूरचित्रवाहिन्यांवरही विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम दाखवले जातात. चर्चासत्रांच्या कार्यक्रमांत हिंदु धर्मावर आगपाखड करायची आणि सकाळी प्रवचन, कीर्तन, भजने असे काही ना काही दाखवायचे असे वाहिन्यांनीही चालू केले होते. त्यांच्यावर ती वेळ का आली ? समाजातील बहुतांश लोकांना ते आवडते म्हणूनच ना ? या कार्यक्रमांना प्रेक्षकवर्ग नसता, तर त्यांनी ते कार्यक्रम दाखवले असते का ? इतकेच काय आज पुरो(अधो)गामी म्हणवून घेणारी सर्व वृत्तपत्रेही आवर्जून आध्यात्मिक सदर चालू ठेवतात. ते कशासाठी ? अध्यात्म काही ‘पुरोगामी’ झालेले नाही. ते सनातनच आहे. एवढेच कशाला रामायण, महाभारत या मालिकांनी भारतियांना आजच्या काळातही त्यांचे उद्योग बंद करून खिळवून ठेवले; ते त्यामध्ये असे काही तरी आहे, जे समाजमनाला भावले म्हणूनच ना ? बाबा आढाव यांचे वरील वक्तव्य म्हणजे सनातन धर्म म्हणजे काही तरी अंधश्रद्धाळू, भयंकर आणि समाजविघातक आहे; ज्याविषयीचा कार्यक्रम ऐकला, तर समाजाची हानी होणार आहे, अशा प्रकारचे आहे. विश्वातील प्रत्येक माणूस आज मनःशांतीच्या शोधात आहे. आकाशवाणीवर अनेक वर्षांपासून पहाटेच्या वेळी अंतर्मुख करणारे विचार ऐकवणारे कार्यक्रम होत आहेत. श्रोत्यांना ते ऐकून आत्मिक समाधान मिळते. या कार्यक्रमांनी त्यांना ‘चिंतन’ करण्यास प्रवृत्त करून अंतर्मुख केले आहे. ज्या कष्टकरी वर्गातून महाराष्ट्रातील संतपरंपरा जन्माला आली, त्यांनीही त्यांचे अभंग, ओव्या यांतून माणसाला जीवनाचा आणि पर्यायाने ईश्वराचा विचार करायला लावणारे ‘चिंतन’च सांगितले आहे. ‘आकाशवाणीच्या ‘चिंतन’ कार्यक्रमातून सरकार अवैज्ञानिक काहीतरी पसरवत आहे’, असे म्हणणार्या आढाव यांनी जाणून घ्यावे की, सनातन धर्म हा मूलतःच संपूर्ण तर्कशुद्ध, शास्त्रशुद्ध आणि अत्यंत पर्यावरणपूरक आहे; अन्य पंथियांप्रमाणे अघोरी अन् अमानवी प्रथांनी भरलेला नव्हे. जेव्हा विश्वातील अन्य पंथीय जंगली संस्कृतीत जगत होते, तेव्हा सनातन संस्कृतीच्या समृद्ध राजवटी येथे होत्या. अगदी १९ व्या शतकापर्यंत विदेशातील शहरांत गलिच्छपणाचा कहर होता, तेव्हा सनातनधर्मी अत्यंत उन्नत संस्कृतीचे जीवन जगत होते. मार्क्स आणि लेनिन यांच्या ‘वादा’ने केवळ आक्रस्ताळेपणाशिवाय मानवाला काही दिलेले नाही. केवळ आंदोलनाने कुणी दुःखमुक्त होत नाही. खरा समान अधिकार हा सनातन संस्कृतीतील ऋषीसंस्कृतीने निर्माण केला आहे. सर्व स्तरांतून आलेल्या ऋषींनी सनातन संस्कृती निर्माण केली आहे, हे सत्य आढाव यांनी समजून घ्यावे. केवळ मनु यांचे नाव घेऊन एकदा काहीबाही बोलले की, द्वेष पसरवण्याचे काम झाले, असे जणू गणितच विद्रोही आणि साम्यवादी यांनी मांडलेले आहे.
मनुस्मृति अभ्यासावी !
वरील कार्यक्रमात आढाव म्हणाले की, मनुवादी विषमतेवर आधारित व्यवस्था संपवण्यासाठी आपण भारतीय घटनेचा स्वीकार केला आहे. मनुस्मृतिमध्ये उच्च-नीच जाती अशा प्रकारचा उल्लेख नाही. कर्मावर आधारित वर्णांचा त्यात उल्लेख आहे. सध्याही पात्रतेनुसार काम दिले जाते. शिपायाचे काम ज्याला येते त्याला शिपायाचे आणि अधिकार्याचे काम येते त्याला अधिकार्याचे काम दिले जाते. तसेच ते आहे. एकीकडे ‘वेदांना मानत नाही’, असे म्हणायचे आणि दुसरीकडे ‘शूद्रांना ब्राह्मणांनी वेदांचे ज्ञान दिले नाही’, असे म्हणायचे, हा दुटप्पीपणा जसा पाखंड्यांची भांडाफोड करणारा आहे, तसेच एकीकडे ‘मनुस्मृति मानत नाही’ म्हणायचे आणि दुसरीकडे मात्र सतत मनु यांच्या नावाने टाहो फोडायचा, हा आढाव यांचा दुटप्पीपणा होय. आढाव यांनी मनुस्मृतीचा नीट अभ्यास केला, तर राज्यघटनेपेक्षाही अधिक व्यापकपणे वर्णित केलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधूता मनुस्मृतीत कशी आहे, हे त्यांच्या लक्षात येईल. दुसर्या अध्यायात मनु यांनी स्पष्टपणे सांगितले आहे, ‘ब्राह्मणाने ‘सन्माना’ला विषाप्रमाणे दूर ठेवले पाहिजेे आणि अवमानाला अमृताप्रमाणे जवळ केले पाहिजे.’ आठव्या अध्यायात ‘ब्राह्मणांना अन्य वर्णियांपेक्षा ६४, १०० किंवा १२८ पट अधिक दंडित केले जावे’, अशा अर्थाचा ३३८ क्रमांकाचा श्लोक त्यात आहे. त्या त्या वर्णातील व्यक्तीने तिचे कर्तव्य बजावले नाही, तर तिचा वर्ण आपोआप पालटला जातो. त्यानुसार ब्राह्मण शूद्र होऊ शकतो किंवा शूद्रही क्षमता वाढवल्यास कोणत्याही वर्णाचा होऊ शकतो. मनुस्मृतीतील १० व्या अध्यायातील या अर्थाच्या श्लोकाप्रमाणेच सनातन संस्कृती सहस्रो वर्षे प्रत्यक्षात अस्तित्वात होती. त्यामुळे ऊठसूठ मनुवादाचे संदर्भ देत सनातन धर्माविषयीची गरळओक आढाव यांच्यासारख्यांनी आता बंद करावी, हेच खरे.