कुख्यात गुंड रवि पुजारी याला ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
मुंबई – येथील गजाली रेस्टॉरंटमधील गोळीबाराच्या प्रकरणी अटकेत असलेला कुख्यात गुंड रवि पुजारी याला मुंबई सत्र न्यायालयाने ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. मुंबईच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी ही माहिती दिली.
वर्ष १९९० च्या दशकात मुंबईमध्ये रवि पुजारी याचे कुख्यात गुंड म्हणून नाव झाले. त्याच्यावर हत्या आणि खंडणी आदी गंभीर गुन्हे नोंद आहेत. मागील काही वर्षांपूर्वी पुजारी याने भारतातून पलायन केले होते. त्याला ‘सेनेगल’ या देशात अटक करण्यात आले. येथून २२ फेब्रुवारी या दिवशी त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. त्याला भारतात आणण्यासाठी भारताची गुप्तचर संघटना ‘रॉ’ आणि कर्नाटक पोलीस यांचे विशेष पथक सेनेगल या देशात गेले होते. तेथून त्याला कर्नाटक येथे आणल्यानंतर तेथील न्यायालयाच्या मान्यतेनंतर आता मुंबई पोलिसांनी पुजारी याला कह्यात घेतले आहे.