गुरूंचे तंतोतंत आज्ञापालन करणारे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज !
२४ फेब्रुवारी २०२१ या दिवशी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज जयंती आहे. या निमित्ताने…
१. गुरूंनी पाने तोडायला सांगितल्यावर त्वरित तोडणे आणि पाने पुन्हा झाडाला लावायला सांगितल्यावर पुन्हा झाडाला लावणे
‘तुकाई (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे गुरु) एकदा शेतात वडाच्या झाडाखाली बसले होते. गणू (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) मागे उभा होता. तुकाईने आज्ञा केली, ‘‘अरे, या झाडाची पाने तोड बघू.’’ तेव्हा गणूने झाडावर चढून पाने तोडली. काही पाने तुकाईने हातात घेऊन पाहिली, तर पानांना दूध सुटले होते. ते ओरडले, ‘‘अरे, आता पुरे ! पाने तोडली, तर त्या झाडांना त्रास होतो. बघ त्यातून दूध गळत आहे. तोडलेली पाने जिथल्या तिथे लावून टाक.’’
आज्ञा प्रमाण मानून गणूने एकेक पान तोडलेल्या ठिकाणी पुन्हा पान लावण्याचा क्रम चालू केला. काही वेळातच सर्व पाने जागच्या जागी लावून झाली. तुकाई म्हणाले, ‘‘शाबास ! याला म्हणतात आज्ञापालन !’’
२. तुकाईंच्या आज्ञेप्रमाणे डोहात उडी मारल्यावर पुन्हा वर येण्यासाठी आज्ञा होईपर्यंत डोहाच्या तळाशी पडून रहाणे
‘एकदा तुकाईंनी गणूला ‘डोहात उडी मार’ म्हणून आज्ञा केली. गणूने उडी मारली; परंतु वर येण्याची आज्ञा न दिल्याने तो तसाच तळाशी पडून राहिला. तुकाईंनी आरडाओरडा केला. त्यामुळे लोक गोळा झाले. त्यांनी डोहात गळ टाकला; परंतु गणूचा पत्ता नव्हता. सर्वजण रडू लागले. हा प्रकार दोन-तीन घंटे चालू होता. शेवटी तुकाई ओरडले, ‘‘बाळ, तू आता वर आला नाहीस, तर मी डोहात उडी टाकून जीव देईन.’’ गुरूंचे शब्द कानी पडताच गणू पाण्यातून उसळी मारून वर आला. तुकाईंनी त्याला आपल्या पोटाशी धरले.’
– (सद्गुरु) डॉ. वसंत बाळाजी आठवले (वर्ष १९९१)