रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अधिवक्त्यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र !
अधिवक्त्यांवर ही वेळ का येते ? प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ?
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – अनेक वेळा शासनाकडे लिखित मागणी करूनही पंढरपूर तिर्हे मार्गे सोलापूरकडे जाणारा रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने येथील अधिवक्ता विजयकुमार नागटिळक यांनी स्वत:च्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र लिहिले आहे. पंढरपूर तिर्हे मार्गे सोलापूर या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून जाणार्या सहस्रो लोकांची असुविधा होत आहे. (रस्त्याची दुरुस्ती ही प्राथमिक गरजही पूर्ण करू न शकणारे प्रशासन नागरिकांपर्यंत विविध सुविधा काय पोचवणार ? आपल्या मागणीची नोंद घ्यावी यासाठी नागरिकांना रक्ताने पत्र लिहिण्याची वेळ येते, हे स्थानिक लोकप्रतिनिधींसाठी लज्जास्पद आहे ! – संपादक) पंढरपूरकडे येणार्या अनेक रस्त्यांची कामे झाली आहेत; मात्र पंढरपूर तिर्हे मार्गे सोलापूर या रस्त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. अनेक वेळा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.