पू. दाभोलकरकाका यांना अनुभवायला आलेले आयुर्वेद उपचारांचे महत्त्व !

बद्धकोष्ठतेचा त्रास होत असतांना आधुनिक वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे पाणी पिण्याचे प्रमाण वाढवल्यावर कोणताही लाभ न होणे आणि आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे पाणी पिण्याचे प्रमाण न्यून केल्यावर पोटासंबंधीचे सर्व त्रास थांबणे

पू. गुरुनाथ दाभोलकर

१. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेखात जगद्गुरु शंकराचार्य श्री निश्‍चलानंद सरस्वती यांनी ‘पाणी पिण्यानेसुद्धा गॅस वाढतो’, असे विधान केलेले असणे

 ‘७.६.२०२० या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये जगद्गुरु शंकराचार्य श्री निश्‍चलानंद सरस्वती (गोवर्धन मठ, पुरी, ओडिशा) यांनी लिहिलेला एक मार्गदर्शनपर लेख प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखात शेवटी त्यांनी अत्यंत महत्त्वाचे सूत्र कथन केलेले आहे, ‘पूर्वी गंगातटी किंवा समुद्रकिनारी फिरावयास गेल्याने रोग निवारण होत असे; पण आज पाणी पिण्यानेसुद्धा गॅस वाढतो.’

२. ‘पाणीसुद्धा पचावे लागते, न पचल्यास शरिराला ते अपायकारक आहे’, असे ‘आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !’ या  ग्रंथात दिले आहे’, असे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगणे

त्या वेळी मला सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेले एक वाक्य आठवले. मी मला निर्माण होणार्‍या पोटाच्या त्रासासंबंधी (विकाराविषयी) त्यांच्याशी बोलत होतो. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘अहो, ‘आपल्या ‘आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !’ या ग्रंथामध्ये पाणीसुद्धा पचावे लागते. न पचल्यास ते शरिराला अपायकारक आहे’, असे सांगितले आहे. हे मलाही ठाऊक नव्हते. मी तो ग्रंथ वाचल्यावर मला ते समजले. तुम्ही किती पाणी पिता ?’’ तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर माझा नित्य दिनक्रम उभा राहिला आणि ‘मी दिवसाला किती पाणी पितो ?’, याचा हिशोब चालू केला.

३. बद्धकोष्ठतेचा त्रास असल्याने एका आधुनिक वैद्यांनी प्रतिदिन १० पेले पाणी पिण्यास आणि औषध घेण्यास सांगणे, ते उपचार करूनही लाभ न झाल्याने रुग्णालयात जाणे अन् तेथे प्रतिदिन १२ पेले पाणी पिण्यास आणि औषध घेण्यास सांगितले जाणे

मला बद्धकोष्ठतेचा त्रास आहे. औषध घेऊनसुद्धा हा त्रास २ – २ दिवस सहन करावा लागतो. एका आधुनिक वैद्यांनी मला प्रतिदिन १० पेले पाणी पिण्यास सांगितले, तसेच रात्री झोपतांना औषध १५ मिली घेण्यास सांगितले. हे उपाय केल्यावरही काहीच लाभ झाला नाही. तेव्हा दुसर्‍या दिवशी त्यांनी औषध ३० मिली घ्यायला सांगितले. तोही प्रयत्न निष्फळ झाला. त्यांनी ते औषध ३ दिवस सकाळ – संध्याकाळ ३० – ३० मिली घ्यायला सांगितले. तसे केल्यावर चौथ्या दिवशी सकाळी माझे केवळ पोट ३० ते ४० टक्के साफ झाले.

यानंतर आधुनिक वैद्यांनी मला रुग्णालयात जायला सांगितले. तेथील आधुनिक वैद्यांना मी माझा त्रास सांगितला. तेव्हा त्यांनी ‘प्रतिदिन १२ पेले पाणी प्या आणि हे औषध १५ मिली घ्या.  १५ मिली घेऊनही पोट साफ न झाल्यास ते ३० मिली घ्या’, असे त्यांनी सांगितले. त्या वेळी मी त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही सांगितलेला सगळा उपाय माझ्याकडून झाला आहे.’’ हे बोलणे चालू असतांना ते मला मधेच थांबवून म्हणाले, ‘‘आमच्याकडे आल्यानंतर आम्ही सांगतो ते ऐकायचे आणि करायला सांगतो, ते करायचे !’’ एवढे बोलून त्यांनी पुढच्या रुग्णाशी बोलणे चालू केले.

४. १० पेले पाणी प्यायल्यावर पाय सुजू लागणे आणि प्रतिदिन पाणी पिण्याचे प्रमाण ५ – ६ पेल्यांवर आणल्यावर दोन दिवसांत पायांची सूज निघून जाणे

पहिल्यापासून मी पहाटे ४ वाजता उठून मुखमार्जन केल्यावर नित्यनेमाने अनशापोटी (रिकाम्या पोटी) दोन पेले पाणी पित होतो. आधुनिक वैद्यांच्या सूचनेप्रमाणे मी १२ पेले पाणी पिण्याचा प्रयत्न केला; पण १० पेल्यांच्यावर पाणी पिणे मला शक्य झाले नाही; कारण सकाळी अल्पाहारामध्ये मी प्रतिदिन १ वाडगे रव्याची अथवा नाचणीची खीर घेतो. दुपारच्या आणि रात्रीच्या महाप्रसादाच्या वेळी मी वाडगे भरून उकड्या तांदळाची पेज, एक मोठा पेला सूप, एक वाटी डाळीचे पाणी आणि भाजी-पोळी घेतो, तसेच दिवसातून तीन वेळा औषधाच्या समवेत अर्धा-पाऊण पेला पाणी पितो. आहारात एवढे पातळ पदार्थ असून आणि दिलेले औषध घेऊनसुद्धा माझा बद्धकोष्ठतेचा त्रास न्यून होत नव्हता. याचेच मला आश्‍चर्य वाटत होते. दहा पेले पाणी प्यायल्यावर माझे पाय सुजू लागले. तेव्हा मी पाणी पिण्याचे प्रमाण ५ – ६ पेल्यांवर आणले. तेव्हा दोन दिवसांत माझ्या पायांवरील सूज निघून गेली.

५. पहाटे अनशापोटी २ पेले पाणी पित असतांना दोन घंट्यांनंतर पोटात कालवाकालव होऊन मळमळणे, त्यानंतर अल्पाहार घेतल्यानंतर हळूहळू शांत वाटणे आणि असाच त्रास महाप्रसाद घेण्यापूर्वी होत असणे

जेव्हा मी पहाटे अनशापोटी दोन पेले पाणी पित होत होतो, तेव्हा सुमारे दोन घंट्यांनंतर पोटात कालवाकालव होऊन मला मळमळत असे. काही प्रमाणात वेदनाही होत असत; पण सकाळी ८.३० वाजता अल्पाहार घेतल्यानंतर हळूहळू शांत वाटत असे. दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास सकाळप्रमाणे त्रास चालू होई आणि तो १ वाजता महाप्रसाद घेतल्यानंतर न्यून होत असे. पुन्हा दुपारी ४.३० ते ४.४५ वाजण्याच्या सुमारास त्रासाला आरंभ होत असे. तो रात्रीच्या महाप्रसादापर्यंत चालूच असे. कधी कधी दुपारी ४.३० नंतर पोटात पुष्कळ पित्त निर्माण होत असे. आहारात चुकून कधी मसाल्याची आमटी अथवा कडधान्याची उसळ घेतलेली असल्यास पोटात असह्य वेदना होऊन २ – ३ वेळा आम्लयुक्त उलटी होई. औषधाच्या गोळ्या घेतल्यानंतर त्वरित उलट्या होऊन गोळ्या तशाच बाहेर पडत असत. मला रात्री अनेक वेळा उपाशी झोपावे लागत होते.

६. पाणी पिण्याचे प्रमाण न्यून केल्यावर औषध आणि पाणी न घेताही पोट साफ होणे

जगद्गुरु श्री निश्‍चलानंद सरस्वती यांचे वक्तव्य आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे मी पाणी पिण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा न्यून केले आहे. परात्पर गुरुमाऊलींच्या कृपेने वर सांगितल्याप्रमाणे होत असलेले त्रास गेले दोन-अडीच मासांपासून पूर्णपणे थांबलेले असून समाधानाची गोष्ट म्हणजे औषध न घेताही माझे पोट साफ होत आहे.’

– (पू.) श्री. गुरुनाथ दाभोलकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.७.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक