हे शेतकरी आंदोलन नसून देशविरोधातील एक युद्ध ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन न्यूज’
हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष चर्चासत्रांतर्गत ‘शेतकरी आंदोलन कि देशविरोधी षड्यंत्र ?’ या विषयावर ऑनलाईन परिसंवाद
पुणे – शेतकरी आंदोलन करणार्या आंदोलकांच्या हातात तलवारी असूनही त्यांच्या देशविरोधातील युद्धाला आंदोलन म्हटले जात आहे. प्रसारमाध्यमे या आंदोलनाला शेतकरी आंदोलन म्हणत आहेत. एका व्यक्तीच्या केवळ रडण्याच्या कारणावरून सहस्रो लोक एकत्र येत असतील, तर आपल्या हिंदु बांधवांची गळा चिरून हत्या केली जात असतांना हिंदू एकत्र का येत नाहीत ? ‘शत्रूचा शत्रू हा मित्र असतो’, या नीतीने आपणही आपले मित्र शोधायला हवेत. संघटना वेगळ्या असल्या, तरी हिंदुत्वासाठी पक्षविरहित एकत्र येणे आवश्यक आहे. हे शेतकरी आंदोलन नसून देशविरोधातील एक युद्ध आहे, असे प्रतिपादन ‘सुदर्शन न्यूज’ वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक आणि अध्यक्ष श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले.
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘चर्चा हिंदु राष्ट्राची !’ या विशेष चर्चासत्रामध्ये ‘शेतकरी आंदोलन कि देशविरोधी षड्यंत्र ?’ या विषयावर ऑनलाईन आयोजित केलेल्या विशेष परिसंवादात ते बोलत होते. या कार्यक्रमात उत्तरप्रदेश येथील ‘इंडिक अॅकेडमी’चे समन्वयक श्री. विकास सारस्वत, प्रसिद्ध लेखिका आणि ‘मानुषी’ संस्थेच्या संस्थापक संपादिका प्रा. मधु पूर्णिमा किश्वर आणि समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे हे उपस्थित होते. समितीचे सर्वश्री सतीश कोचरेकर आणि प्रशांत जुवेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
२६ जानेवारीला झालेले आंदोलन म्हणजे विद्रोह नसून राजद्रोह ! – विकास सारस्वत
राज्यघटनेने ‘आंदोलन करावे’, असे सांगितलेले नाही. आंदोलने झाली नाहीत, तर देश संकटात येणार नाही. आतापर्यंत नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकता नोंदणी प्रक्रिया यांच्या (एन्.आर्.सी.) विरोधात झालेल्या आंदोलनाचे नेमके सूत्र काय होते, हे कधीच निश्चित समजले नाही.
२६ जानेवारी या दिवशी झालेले आंदोलन म्हणजे विद्रोह नव्हे, तर राजद्रोह होता. या आंदोलकांची दृष्टीच इस्लामी राजवटीकडे नेण्यासाठी आहे. राकेश टिकैत यांचे बोलवते धनी ‘पी.एफ्.आय.’शी संबंधित आहेत, हे त्यांच्या वक्तव्यांवरून समजते. देशाचे विभाजन करणारी विचारसरणी आजही तेवढीच आहे, जेवढी ती ६० वर्षांपूर्वी होती. ‘मी हिंदु आहे’, ही जाणीवच हिंदूंना पुढे आणू शकेल. राजधानी देहलीमध्ये देशविरोधी घटना झाली. अशा घटना होत असतील, तर विकास केल्याचा किती उपयोग झाला ? याचा विचार करायला हवा.
हिंदूंच्या बाजूने शासन उभे राहिल्यासच हिंदूंना प्रभावी कार्य करता येईल ! – प्रा. मधु पूर्णिमा किश्वर
तत्कालीन काँग्रेस सरकारने पुरोगामी, साम्यवादी विचारसरणीचे पक्ष, इस्लामवादी लोक, परदेशातून अनुदान मिळवणार्या संस्था यांना इतके महत्त्व दिले की, त्यांच्याविना कोणताच कायदा अस्तित्वात येऊ शकत नाही, अशी त्यांची धारणा झाली आहे. ‘मुस्लिम पर्सनल लॉ’मध्ये एक स्वल्पविरामाचा जरी पालट केला, तर सगळ्या देशात हिंसाचार होईल. आताची परिस्थिती पहाता हिंदूंना जगात अल्पसंख्यांक समाज म्हणून घोषित करायला हवे. आपल्या शिक्षणपद्धतीतून इंग्रजी भाषेत स्वतःला हिंदु होण्याचा बोध होणे अतिशय अशक्य आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देणारी केंद्रे नष्ट होत आहेत. पोलीस आणि अन्य प्रशासन भ्रष्ट झाल्याने हिंदूंना साहाय्य करणारेच उरलेले नाहीत. जागृत हिंदूंनीच अतिशय कष्ट घेऊन अन्य हिंदूंना विविध माध्यमांतून जागृत करायला हवे. हिंदूंच्या बाजूने शासन उभे राहिल्यासच हिंदूंना कार्य करता येईल.
हिंदु राष्ट्राची विचारधारा, हेच सर्व प्रश्नांवरील एकमेव उत्तर ! – रमेश शिंदे
शेतकरी आंदोलनाच्या वेळी जे घडले, त्याविषयीची वास्तविक स्थिती पहाता ही संकटांची चाहूल नसून हे संकट देशाच्या राजधानीत तेसुद्धा प्रजासत्ताकदिनी सर्व सीमा पार करून आपल्या दाराशी आले आहे. यासाठीच हिंदूंना एकत्र आणण्याचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे. महाराष्ट्रातीलच ‘सायबर सेल’ने सिद्ध केलेल्या एका अहवालात म्हटले आहे की, शेतकरी आंदोलनाविषयी सामाजिक माध्यमांतून ज्या काही मोहिमा राबवण्यात आल्या, त्या सर्व मोहिमा ब्रिटन, कॅनडा अशा देशांतून राबवण्यात आल्या. त्यामध्ये १२ सहस्र ८०० ट्वीट्स या देशविरोधी होत्या. साम्यवादी पक्षाच्याच पक्षघटनेत लिहिले आहे की, अल्पसंख्यांकांनी बहुसंख्यांकांच्या निर्णयाला ग्राह्य धरायला हवे; परंतु भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात मात्र उलट विचार केला जात आहे. स्वतःच्याच विचारधारेच्या उलट कार्य करणारे सध्याचे साम्यवादी आहेत. हे सत्य समाजासमोर आणायला हवे. या आंदोलनांमध्ये ‘शहिद-ए-खलिस्तान’ अशा नावाची पुस्तके वाटण्यात आली. देशात चालू असलेल्या खोट्या प्रचारतंत्रांविषयी हिंदु समाजाला जागृत करण्याची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्राची विचारधारा हेच सर्व प्रश्नांवरील उत्तर आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) January 30, 2021
विशेष : हा कार्यक्रम ‘यू ट्यूब’ आणि फेसबूक यांच्या माध्यमांतून ३४ सहस्रांहून अधिक लोकांनी पाहिला.