कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेतील पालटाची आरोग्य विभागाकडून तपासणी
सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ !
सातारा, २१ फेब्रुवारी (वार्ता.) – राज्यातील इतर जिल्ह्यांसह सातारा जिल्ह्यात मागील काही आठवड्यांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेतील पालटाचीही तपासणी हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील ४ नमुने पुणे येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तपासण्यात आले आहेत; मात्र ब्रिटन, दक्षिण अफ्रिका आणि ब्राझील आदी देशांमध्ये आढळून आलेला कोरोनाचा नवा ‘स्ट्रेन’ या तपासणीमध्ये आढळून आलेला नाही. याविषयी आखणी तपासण्या चालू आहेत, असे आरोग्य विभागाकडून कळवले आहे.
दहिवडी येथे दळणवळण बंदी जाहीर
दहिवडी येथील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता दहिवडी नगरपंचायत, आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी बैठक घेतली. यामध्ये २०, २१ आणि २२ फेब्रुवारी या दिवशी दहिवडीमध्ये कडक दळणवळण बंदी जाहीर करण्यात आली. रुग्णालय, औषध दुकाने आणि दूधसेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.