‘लॉकडाऊन’ नको असेल, तर कोरोनाचे नियम पाळा ! – मुख्यमंत्री
मुंबई – ज्यांना ‘लॉकडाऊन नको’ त्यांनी शिस्त, नियम पाळणे आवश्यक आहे. मास्क घाला, हात धुवा, अंतर ठेवा. ही बंधने पाळायला लावणारी ‘मी जबाबदार’ ही मोहीम चालू करत आहोत. सामाजिक, राजकीय, धार्मिक, गर्दी करणारे कार्यक्रम, मिरवणुका, मोर्चे, आंदोलने, यात्रा उद्यापासून बंद करत आहोत. ‘वर्क फ्रॉम होम’ करा. येत्या काळात परिस्थिती पाहून दळणवळण बंदीचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून २१ फेब्रुवारी या दिवशी साधलेल्या संवादात सांगितले.
या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ९ लाखांच्या आसपास कोरोना योद्धांना लसीकरण झाले आहे. त्याचे गंभीर दुष्परिणाम लक्षात आलेले नाहीत. त्यामुळे राहिलेल्या कोरोना योद्ध्यांनी लसीकरण करून घ्यावे. ‘लॉकडाऊन’ नको असेल, तर करोनाची शिस्त मोडता कामा नये. संसर्गाची साखळी थांबवायची, तर संपर्क थांबवणे हाच उपाय सध्या माहीत आहे. आता राज्यात ७ सहस्र आणि मुंबईत ९०० रुग्ण सापडले आहेत. कोरोना वहन करणारे दूत होऊ नका. अमरावतीत आज १ सहस्र रुग्ण सापडले आहेत; जे त्याच्या उच्चांकाच्या वेळीही नव्हते. आज आरंभ असा झाला, तर आरोग्य सुविधा अनेक पटीने वाढूनही ताण येईल. पुन्हा अनर्थ होईल. कोरोना योद्ध्यांचेे बलीदान व्यर्थ जाऊ देऊ नका.