छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानाविषयी नेकेलिस नोरोन्हा यांच्या विरोधात डिचोली पोलीस ठाण्यात तक्रार
डिचोली, २१ फेब्रुवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक भाषा वापरल्याच्या कारणावरून एक शिवप्रेमी नागरिक अभिजित नाईक यांनी नेकेलिस नोरोन्हा यांच्या विरोधात डिचोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यांनी या तक्रारीत म्हटले आहे, ‘‘जेव्हा ‘गोंयचो पात्रांव’ या वृत्तवाहिनीवर कार्यक्रम चालू होता, तेव्हा नेकेलिस नोरोन्हा यांनी फेसबूकवरील गटावर ‘चॅट’ मध्ये अभिप्राय नोंदवतांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक भाषा वापरली आहे. मला आशा आहे की, आपण आपल्या सायबर शाखेकडून चौकशी करून नेकेलिस नोरोन्हा यांच्यावर लगेच कारवाई कराल; कारण त्यांनी भूमातेचे सुपुत्र असलेल्या छत्रपती शिवाजी महारांजाचा अवमान करून गोव्यातील समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. आम्ही भारतीय आहोत. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या शूरवीरांमुळे परकीय सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यांनी आम्हाला सत्यासाठी लढण्यास बळ दिले आहे. त्यामुळे नेकेलिस नरोन्हा यांच्यावर आपण त्वरित कारवाई करून त्यांना अटक करावी, अशी मागणी मी करत आहे.’’