कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांत कठोर निर्बंध !
अमरावती आणि अचलपूर येथे दळणवळण बंदी
नागपूर – कोरोनाचे प्रमाण पुष्कळ वाढल्याने विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अमरावती शहरात १२ प्रतिबंधित क्षेत्रे, तर नागपूर, यवतमाळ, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांतही ‘दळणवळण बंदी’च्या नियमांचे काटेकोर पालन करण्यावर भर दिला जात आहे. अमरावती आणि अचलपूर येथे ७ दिवस दळणवळण बंदी घोषित करण्यात आली आहे, असे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अमरावती – जिल्ह्यात प्रती दिवसाला वाढणारी कोरोनाच्या रुग्णांची संख्या पहाता महानगरपालिकेने शहरातील १२ प्रतिबंधित क्षेत्रांतील रहिवाशांना १४ दिवसांपर्यंत घराच्या बाहेर निघता येणार नाही, असे सांगितले. या ठिकाणी ‘बॅरिकेट्स’ लावण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रात सध्या २ सहस्र ७८३ कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आहेत. जिल्ह्यातील परतडवाडा आणि अचलपूर या दोन्ही शहरांत घरोघरी रुग्ण आढळत आहेत.
अकोला – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने २१ फेब्रुवारीला एका दिवसाची ‘दळणवळण बंदी’ घोषित करण्यात आली. त्यामुळे शहरात शुकशुकाट होता, तसेच जिल्ह्यातील ‘कोविड केअर सेंटर’ २२ फेब्रुवारीपासून पुन्हा चालू करण्यात येत असून ‘पॉझिटिव्ह’ रुग्णाला थेट ‘कोविड केअर सेंटर’मध्ये भरती करण्यात येणार आहे.
वर्धा – येथे कठोर संचारबंदी चालू आहे. वाहतूक व्यवस्था बंद असल्याने अनेक प्रवाशांना बस स्थानकातच ताटकळत रहावे लागले आहे. रेल्वेने वर्धा येथे आलेल्या प्रवाशांचीही मोठी गैरसोय होत आहे. २२ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू रहाणार आहे. दुकानदारांनी स्वत:हून दुकाने बंद केली आहेत. औषधांची दुकाने वगळता वर्धा येथे सर्वच आस्थापने बंद असल्याने शहरात शुकशुकाट आहे.
नागपूर – जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ‘आवश्यकता नसेल, तर घराबाहेर पडू नका’, असे आवाहन नागरिकांना केले आहे, तसेच कोरोना प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन न करणार्या नागरिकांकडून आतापर्यंत १ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. नियम मोडणारी मंगल कार्यालये, रिसॉर्ट आणि लॉन्स यांवर कारवाई करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. खासगी आधुनिक वैद्यांकडे येणार्या रुग्णांची पडताळणी करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
यवतमाळ – येथे कोरोनाचे रुग्ण वाढत असून कोरोनाचे नियम मोडल्यास गुन्हे नोंद करण्यात येणार असल्याची चेतावणी प्रशासनाने दिली आहे. ‘कोव्हिड १९’ रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी रुग्णवाहिका आणि ‘कोव्हिड केअर सेंटर्स’ पूर्ववत् करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. विनामास्क फिरणार्या लोकांकडून दंड वसूल करण्यात येत आहे.
शेतकरी नेत्यांची सभा घेतल्याने आयोजकांवर गुन्हे नोंदवर्धा येथील बजाज चौक येथे शेतकरी नेत्यांची सभा घेऊन गर्दी जमवल्याप्रकरणी सभेचे आयोजक आणि वर्धा कामगार शेतकरी आंदोलन कृती समितीचे अविनाश काकडे, अनिल जवादे, नीरज गुजर, मंगेश शेंडे, गजेंद्र सुरकार, श्रीकांत तराळ यांच्यावर पोलिसांनी ‘आपत्ती व्यवस्थापन कायद्या’नुसार गुन्हे नोंद केले आहेत. |
नाशिक येथे रात्री ११ ते पहाटे ५ संचारबंदी
नाशिक – येथे रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. सामाजिक न्यायमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.