देवद आश्रमातील साधक श्री. सुरेश सावंत यांना तुळजापूर येथे कुलदेवता श्री भवानीदेवीच्या दर्शनासाठी गेल्यावर आलेल्या अनुभूती
१. श्री भवानीदेवीच्या दर्शनासाठी रांगेतून जातांना अगदी शरणागतभावाने नामजप केल्यामुळे देवीपर्यंत पोचेपर्यंत ‘१ घंटा रांगेत उभे होतो’, हे लक्षात न येणे आणि त्या प्रसंगी स्वतःमधील चैतन्य पुष्कळ वाढल्याचे जाणवणे
‘प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही सावंत कुटुंबीय १.२.२०१९ ते ३.२.२०१९ या कालावधीत तुळजापूर येथे कुलदेवता श्री भवानीदेवीचे दर्शन, ओटी भरणे आणि अभिषेक करणे यांसाठी गेलो होतो. श्री भवानीदेवीच्या दर्शनासाठी रांगेतून जातांना आमच्याकडून अगदी शरणागतभावाने नामजप झाला. त्यामुळे रांगेत १ घंटा उभे राहूनही ‘आम्ही देवीच्या चरणांपर्यंत कधी पोचलो’, हे माझ्या लक्षातच आले नाही. त्या वेळी मला स्वतःमधील चैतन्य पुष्कळ वाढल्याचे जाणवले.
२. पुजार्यांनी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या वतीने श्री भवानीदेवीला ‘सनातनच्या सर्व साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर होऊ देत अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य आणि चांगले आरोग्य प्राप्त होऊ दे’, अशा प्रार्थना करणे
या वेळी नेहमीचे पुजारी श्री. अमित कदम तेथे उपस्थित नव्हते. त्यामुळे आम्ही त्यांच्या भावाला परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या आज्ञेनुसार नेहमीप्रमाणे श्री भवानीदेवीला अभिषेक करण्यास सांगितले. आम्ही त्यांना परात्पर गुरु पांडे महाराज यांचे नाव, गोत्र आणि जन्मनाव सांगितले. मग त्यांनी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या वतीने देवीच्या चरणी प्रार्थना केली, ‘सनातनच्या सर्व साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर होऊ देत, तसेच सर्वांमध्ये राष्ट्र अन् धर्म यांच्या कार्यात सहभागी होण्याची तळमळ वाढून या कार्यात सर्वांचा सक्रीय सहभाग वाढू दे.’ या प्रसंगी पुजार्यांनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य आणि चांगले आरोग्य प्राप्त होऊ दे’, अशीही प्रार्थना देवीच्या चरणी केली.
३. ‘परात्पर गुरु पांडे महाराजांनी सांगितलेली प्रार्थना करता यावी’, यासाठी आणि देवी साधकांना समष्टी कार्यासाठी भरभरून आशीर्वाद देऊ इच्छित असल्याने देवीने पुजार्यांद्वारे किंवा रक्षकांद्वारे तिच्या समोरून बाजूला केले नाही’, असे साधकाला वाटणे
आमचा आतापर्यंतचा अनुभव असा की, श्री भवानीदेवीच्या देवळात गेल्यावर ३ – ४ सेकंदांनंतर आम्हाला देवीच्या समोरून बाजूला केले जाते. या प्रसंगी आम्ही देवीसमोर ४ – ५ मिनिटे उभे राहून प्रार्थना केली, तरीही ‘पुजार्यांनी किंवा रक्षकांनी आम्हाला बाजूला केले नाही’, हा आम्हाला एक चमत्कारच वाटला. या संदर्भात चिंतन केल्यावर माझ्या लक्षात आले, ‘परात्पर गुरु पांडे महाराजांनी सांगितलेली समष्टीसाठीची वरील प्रार्थना करता यावी’, यासाठी, तसेच देवी साधकांना समष्टी कार्यासाठी भरभरून आशीर्वाद देऊ इच्छित असल्याने देवीने आम्हाला पुजार्यांद्वारे किंवा रक्षकांद्वारे तिच्या समोरून बाजूला केले नाही.’ त्या वेळी ‘जणूकाही श्री भवानीदेवी सर्व साधकांच्या वतीने अभिषेक आणि ओटी स्वीकारत आहे’, असे मला जाणवले.
४. श्री भवानीदेवीसमोर ५ मिनिटे उभे राहिल्यावर सर्वाधिक चैतन्य मिळणे
या प्रसंगी श्री भवानीदेवीसमोर ५ मिनिटे उभे राहिल्यामुळे मला चैतन्याने भारित झाल्यासारखे जाणवले आणि दिवसभर माझ्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण आले नाही.’
– श्री. सुरेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (४.२.२०१९)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |