सनातनचे साधक श्री. गजानन लोंढे यांना धर्मरथावर सेवा करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
१. ‘धर्मप्रचार हीच सर्वश्रेष्ठ सेवा आहे’, या धर्मरथावरील वाक्याने सेवा करण्यासाठी स्फूर्ती मिळणे
‘मला धर्मरथावर सेवेची संधी मिळाली. तेव्हा ‘धर्मरथ म्हणजे धर्म, राष्ट्र आणि संस्कृती यांचा प्रसार करणारा रथ आहे’, याची जाणीव झाली. धर्मरथाच्या एका दरवाज्यावर लिहिले आहे की, ‘धर्मप्रचार हीच सर्वश्रेष्ठ सेवा आहे’, या वाक्यातून मला धर्मरथावर सेवा करण्याची स्फूर्ती मिळत असे. मला सेवा करतांना थकवा यायचा. त्या वेळी हे वाक्य वाचले की, त्वरित माझा थकवा दूर होत असे.
२. इतर वेळी प्रवास करतांना त्रास होणे; परंतु धर्मरथावर सेवा करतांना त्रास दूर होऊन आनंद मिळणे
पूर्वी मला बस किंवा इतर स्थानिक वाहनातून प्रवास करतांना उलटी होऊन जेवलेले सर्वच बाहेर येत असे. त्यामुळे मी प्रवास करणे टाळायचो. मी कुणाच्या लग्नालासुद्धा जात नव्हतो. ज्या दिवसापासून मी या धर्मरथाच्या सेवेत रुजू झालो, त्या दिवसापासून माझा प्रवासातील हा त्रास संपूर्ण दूर होऊन मला आनंद मिळत आहे.
३. हिशोबाची सेवा बिनचूक करता येणे
धर्मरथावर येण्याआधी मी घरी कोणताच हिशोब पाहिला नव्हता. ही सेवा चालू केल्यावर देवाने मला प्रथम एक मासासाठी सनातन सात्त्विक उत्पादनांच्या वितरणकक्षाची सेवा देऊन सर्व हिशोब बिनचूक करवून घेतला. ही माझ्यासाठी फार मोठी अनुभूती आहे.
४. वाहनाच्या संदर्भातील इतर सेवा शिकता येणे
धर्मरथाचे चाक (टायर) कसे काढायचे, तसेच वाहनाच्या इतर सर्व सेवा परात्पर गुरु डॉक्टरांनी मला उत्तरदायी साधकाच्या माध्यमातून शिकवल्या. मला पूर्वी केवळ वाहनाला इंजिन असते, एवढीच जुजबी ठाऊक होती; परंतु ‘रथातील प्रत्येक भाग हा त्याच्या जीवनातील घटक आहे’, याचा अनुभव या सेवेतून मला मिळाला. ‘वाहनाचा प्रत्येक भाग महत्त्वाचा आहे’, हे समजले.
५. सेवेनिमित्त बाह्य वातावरण वेगवेगळे असूनही त्रास न होणे
धर्मरथाच्या सेवेनिमित्त प्रदर्शन लावण्यासाठी विविध गावे, तालुके, जिल्हे आणि राज्ये अशा ठिकाणी जावे लागते. तेथील पाणी, आहार, निवास आणि परिस्थिती वेगळी असते; परंतु या कालावधीत आम्हा सर्व साधकांना कोणताही त्रास झाला नाही. मला लहानपणापासून १२ वीपर्यंत पुष्कळ सर्दी होत असे; परंतु या सेवेनिमित्त मी बाहेरचे प्रतिदिन वेगवेगळे पाणी पीत असूनही मला कधीच त्रास झाला नाही, यासाठी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी अल्पच आहे.
६. धर्मरथाची वैशिष्ट्ये आणि परात्पर गुरु डॉक्टर यांची कृपा
६ अ. प्रथम विरोध करणार्या लोकांनी नंतर साहाय्य करणे : धर्मरथ लावतांना कधी दुकानदार, स्थानिक व्यक्ती, पोलीस आणि इतर संबंधित व्यक्ती प्रदर्शन लावू देत नसत; पण १० मिनिटांनी तेच लोक रथ लावण्यासाठी साहाय्य करत असत. तेव्हा रथातील चैतन्य आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या कृपाशीर्वादाची अनुभूती रथातील सर्व साधकांना यायची.
६ आ. धर्मरथ चालकाची जागा ध्यानमंदिराप्रमाणे जाणवणे : धर्मरथामध्ये समोर धर्मरथ चालकाची जागा असते, त्या जागेला आम्ही साधक ‘ध्यानमंदिर’ म्हणतो. या जागी मला पुष्कळ आनंद जाणवतो. धर्मरथातील या ध्यानमंदिरामध्ये नामजप करतांना कधी कधी निर्विचार अवस्था अनुभवता येते. तिथे बसल्यावर रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात असल्यासारखे मला आणि प्रसारातील इतर साधकांनाही जाणवते.
६ इ. प्रवास आणि रात्री जागरण होऊनही साधकांचे तोंडवळे आनंदी दिसणे : प्रवास करतांना आम्हाला कधी सकाळी लवकर, तर कधी रात्रीचे १२ वाजेपर्यंत प्रवास करावा लागतो. या कालावधीत सर्व साधक आनंदाने प्रवास करतात. सर्वांचे तोंडवळे आनंदी आणि उत्साही दिसत असतात. तेव्हा ध्यानमंदिरात असलेल्या चैतन्याची अनुभूती येते.
७. धर्मरथाचे देवत्व
७ अ. धर्मरथावर नाडीपट्टीच्या आगमनाने ‘धर्मरथ हा आश्रम आहे’, याची अनुभूती येणे : धर्मरथावर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू आणि सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे आगमन झाले. धर्मरथामध्ये मागील प्रदर्शनाच्या ठिकाणी आणि समोर ध्यानमंदिरात ठेवून नाडीपट्टीची पूजा केली. तेव्हा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंनी सांगितले, ‘‘धर्मरथाची पातळी ६१ टक्के झाली आहे.’’ तेव्हा ही आनंदाची वार्ता ऐकून सर्व साधकांना गदगदून आले. सप्तर्षी जीवनाडीपट्टी रथात आली, त्या वेळी आम्हा सर्व साधकांना ‘धर्मरथ हा एक आश्रम आहे’, याची प्रत्यक्षात अनुभूती आली आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या ‘धर्मरथ हा फिरता (मोबाईल) आश्रम’ आहे. इतर आश्रम एका जागी असतात; पण हा सगळीकडे जातो’, या वाक्याची प्रचीती आली.
७ आ. जिज्ञासूंना धर्मरथ देवळाप्रमाणे वाटणे : धर्मरथावर ज्या ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन लावलेले असते, त्या भागामध्ये जिज्ञासू आणि इतर बाहेरच्या व्यक्ती आल्यावर सांगतात की, ‘मला एखाद्या देवळात आल्यासारखे वाटते.’ ते विचारतात, ‘‘येथे अजून थोडा वेळ थांबू का ?’’ यातून ‘रथामध्ये असलेल्या चैतन्याचा परिणाम समाजातील व्यक्तींनासुद्धा समजतो’, हे लक्षात आले.
७ इ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी धर्मरथाचे चैतन्य संतांइतकेच झाले आहे’, असे सांगणे : जून २०१८ मध्ये परात्पर गुरु डॉक्टर धर्मरथ पाहून म्हणाले, ‘‘धर्मरथाचे चैतन्य वाढले आहे. याची यू.ए.एस्.द्वारे तपासणी करून पहा.’’ तेव्हा यू.ए.एस्.द्वारे तपासणी केली असता ‘धर्मरथाची प्रभावळ (ऑरा) संतांच्या प्रभावळीइतकीच आली. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘आता धर्मरथाचे चैतन्य संतांइतकेच झाले आहे.’’ त्या वेळी त्यांनी धर्मरथाचे चित्रीकरण करायला, तसेच त्याची छायाचित्रे काढायला सांगितले. हे वृत्त मला आणि सहसाधकांना समजल्यावर पुष्कळ कृतज्ञता वाटून भावाश्रू आले. ‘परात्पर गुरु डॉक्टर एका निर्जीव वस्तूलासुद्धा (वाहनाला) मोक्षापर्यंत घेऊन जात आहेत’, याची मला जाणीव झाली. ‘देव संस्थेतील प्रत्येक सजीव-निर्जीव वस्तूंचा याच जन्मी उद्धार करणार आहे’, असे वाटले.
७ ई. धर्मरथात रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिराप्रमाणे चैतन्य जाणवत असल्याचे सद्गुरु राजेंद्रदादा यांनी सांगणे : २०१७ मध्ये पाऊस असल्याने काही मासांसाठी धर्मरथ बंद होता. त्या वेळी धर्मरथ देवद आश्रमात होता. एकदा धर्मरथ पहाण्यासाठी सद्गुरु राजेंद्र शिंदे आले होते. रथातील आतील भागात प्रवेश करून ते चालकाच्या आसंदीवर बसले आणि म्हणाले, ‘‘धर्मरथामध्ये रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिराएवढे चैतन्य आहे.’’
‘हे गुरुमाऊली, हे श्रीकृष्णा, रथातील हे गुण दाखवून मला मी कुठे अल्प पडतो, हे शिकवलेस. सेवा करण्यासाठी धर्मरथ उपलब्ध करून दिलास, यासाठी जेवढी कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी अल्पच आहे. परात्पर गुरु डॉक्टर आणि धर्मरथ यांच्या चरणी यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– धर्मरथचरण सेवक,
श्री. गजानन यल्लाप्पा लोंढे, सनातन आश्रम, पनवेल. (२३.२.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |