संतांनी वापरलेल्या वस्तू भाव, तळमळ, श्रद्धा आणि साधकत्व असणार्या साधकाला देणे आध्यात्मिकदृष्ट्या योग्य !
‘अध्यात्मात ‘सत्पात्रे दानम् ।’ सांगितले आहे; म्हणजे जो सत्पात्री असेल, अर्थात दान मिळवण्यासाठी जो सुपात्र असेल, त्यालाच दान द्यायला हवे. हाच नियम संतांच्या वस्तू प्राप्त करण्याच्या संदर्भात लागू आहे. ज्या साधकांमध्ये भाव, तळमळ, श्रद्धा आणि साधकत्व आहे, त्यांना संतांनी दिलेल्या वस्तू मिळाल्याने त्या वस्तूंतील चैतन्याचा लाभ होऊ शकतो. साधकत्व असल्यामुळे संतांनी दिलेल्या वस्तूंतील चैतन्याचा लाभ सत्कार्यासाठी होतो. तळमळ असल्यामुळे संतांनी दिलेल्या वस्तूंचा लाभ व्यष्टी आणि समष्टी यांच्या कल्याणासाठी होतो. श्रद्धेमुळे मनाचे ईश्वराशी अनुसंधान वाढून संतांच्या वस्तूंतील चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता वाढते. ‘भाव तेथे देव’, या उक्तीनुसार भावामुळे संतांच्या वस्तूंतील चैतन्य टिकून रहाते आणि त्यांतील दिव्यता जागृत रहाते. त्याचप्रमाणे साधकाला वाईट शक्तींचा त्रास असेल, तर संतांनी दिलेल्या वस्तूंतील चैतन्यामुळे साधकावर नामजपादी उपाय होऊन त्याला होणारा त्रास न्यून होतो.
१. संतांनी दिलेल्या वस्तूंवर साधकातील भाव, तळमळ, श्रद्धा आणि साधकत्व या गुणांचा होणारा परिणाम
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.४.२०२०, रात्री ११.३०)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्ह णजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |