कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून गर्दी जमवणार्‍या भाजपच्या २ पदाधिकार्‍यांसह ‘डी’ मार्टवर गुन्हा नोंद

ठाणे – मागील ३ दिवसांपासून कल्याण-डोंबिवली भागातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर महानगरपालिकेसह पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे. मागील ४८ घंट्यांत कार्यक्रम आयोजित करून गर्दी जमवून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपाच्या डोंबिवली येथील संदीप माळी या पदाधिकार्‍यावर मानपाडा पोलीस ठाण्यात, तर कल्याण येथे हळदी-कुंकू कार्यक्रमाद्वारे गर्दी जमवणार्‍या भाजपचे संदीप गायकर या माजी नगरसेवकांवर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळातील नियमांचे पालन न केल्याप्रकरणी बैल बाजार येथील ‘डी’ मार्ट आस्थापनाच्या विरोधात कल्याण येथील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच दोन्ही शहरांमध्ये विनामास्क फिरणार्‍यांच्या विरोधात पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे.