समाजात विषवल्ली पसरवणारे, तसेच देशद्रोहाचा गुन्हा नोंद असलेल्या कन्हैयाकुमार याचे जाहीर व्याख्यान रहित करा !
कोल्हापूर, २० फेब्रुवारी (वार्ता.) – देहली येथील ‘जे.एन्.यू.’ विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमार याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद असून त्याला न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे. हाच कन्हैयाकुमार २० फेब्रुवारी २०२१ या दिवशी कोल्हापूर येथे जाहीर व्याख्यान देण्यासाठी येत आहे. अशा कार्यक्रमांमुळे सामाजिक शांतता भंग होण्याची दाट शक्यता आहे. या कार्यक्रमात अन्य वक्तेही हिंदु धर्माविरोधात गरळओक करू शकतात. तरी कन्हैयाकुमारच्या जाहीर व्याख्यानास कोल्हापूर येथे अनुमती देण्यात येऊ नये, अशा मागणीचे निवेदन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने २० फेब्रुवारी या दिवशी करवीर पोलीस उपअधीक्षक आर्.आर्. पाटील यांना देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यावर पाटील यांनी तात्काळ संबंधित पोलीस ठाण्यांना निवेदनाविषयी सूचित करण्याचे आदेश दिले.
या वेळी शिवसेनेचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिवसेनेचे उपशहरप्रमुख श्री. शशी बीडकर, श्री. किशोर घाटगे, हिंदु एकता आंदोलनचे श्री. चंद्रकांत बराले, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे श्री. नितीश कुलकर्णी, हिंदुत्वनिष्ठ श्री. उदय भोसले, श्री. रामभाऊ मेथे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.
पोलीस उपअधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. ९ फेब्रुवारी २०१६ या दिवशी देशद्रोही महंमद अफजलच्या फाशीला ३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देहलीतील ‘जे.एन्.यू.’त त्याचा ‘स्मृतीदिन’ साजरा केला गेला. या वेळी ‘अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है’, ‘भारत तेरे तुकडे होंगे, इंशाल्लाह, इंशाल्लाह’, ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘कश्मीरकी आझादी तक जंग रहेगी जंग रहेगी, भारतकी बर्बादी तक जंग रहेगी जंग रहेगी’ आदी देशविरोधी घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला कन्हैयाकुमार उपस्थित होता.
२. सध्या देशात आणि राज्यात परत कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे. अशा स्थितीत परत एकदा कोल्हापूर येथे जाहीर कार्यक्रम झाल्यास आणि त्यात कुणी कोरोनाबाधित असल्यास त्यामुळे अनेकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.
३. कन्हैयाकुमारच्या कार्यक्रमास कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी अनुमती नाकारलेली असतांना आयोजक अद्यापही जाहीर कार्यक्रम घेण्यास ठाम आहेत, असे वृत्त प्रसिद्धी माध्यमांतून प्रसिद्ध झाले आहे. हा प्रकार गंभीर असून आयोजक प्रशासनास जुमानत नाहीत, असेच यातून पुढे येते. अशा कार्यक्रमांमधून देशविरोधात फुटीरतेची भावना वाढीस लागणार असल्याने कन्हैयाकुमारच्या बंदीस्त सभागृहातील अथवा जाहीर होणार्या कोणत्याच कार्यक्रमास अनुमती देण्यात येऊ नये.