मराठी भाषा बोलायला शिकणारे एस्.एस्.आर्.एफ्. चे विदेशी साधक !
कु. अॅलिस हिला संस्कृतमधील ‘तोटकाष्टकम्’ म्हणता येते, हे परात्पर गुरु डॉक्टरांना कळल्यावर त्यांना पुष्कळ आनंद झाला आणि त्यांनी ‘अॅलिस मराठी भाषा कशी शिकते अन् संस्कृतमधील स्तोत्रे आणि श्लोक पाठ कसे करते ?’, असे विचारायला सांगितले. तेव्हा अॅलिसने मराठी शिकण्यासाठी ती करत असलेले प्रयत्न येथे दिले आहेत. तिच्यासह अन्य काही विदेशी साधकही मराठी बोलण्यास शिकत आहेत. मराठी आणि संस्कृत या सात्त्विक भाषा असल्याचे विदेशींना कळते. त्यांना त्याचे महत्त्व समजल्याने ते मराठी भाषा शिकतात; पण भारतियांमध्ये स्वभाषाभिमान नसल्याने ते स्वतःच्या मुलांना लहानपणापासूनच कॉन्व्हेंट शाळांमध्ये घालतात. आपल्या मुलांना ‘अस्खलितपणे इंग्रजी भाषा बोलता येते’, याचे त्यांना कौतुक वाटते. हिंदु राष्ट्रात महाराष्ट्रातील सर्व व्यवहार मराठीतूनच असतील. त्यामुळे सनातन संस्था आधीपासूनच मराठी भाषेसाठी आग्रही आहे.
१. कु. अॅलिस स्वेरिदा
‘रामनाथी आश्रमात यज्ञाच्या वेळी म्हटले जाणारे मंत्र संकेतस्थळावर इंग्रजी भाषेमध्येही उपलब्ध असतात. कु. अॅलिस ते मंत्र इंग्रजीत डाऊनलोड करून योग्य त्या उच्चारांसह पाठ करते. त्याचप्रमाणे मराठी दैनिक ‘सनातन प्रभात’ही ती ‘गूगल ट्रान्सलेटर’ या अॅपवर इंग्रजीत भाषांतर करून वाचते. साधक आपापसांत मराठीत बोलत असतांना ती लक्षपूर्वक ऐकते आणि ‘कोणत्या मराठी शब्दाला इंग्रजीत काय म्हणतात ?’, हे विचारून घेऊन वहीत लिहून ठेवते. मराठीतील वाक्ये बोलायला शिकतांना ती कर्ता, कर्म आणि क्रियापद अशा क्रमाने शिकते. त्यामुळे आता अॅलिस हिला मराठीतील काही शब्द आणि काही वाक्ये बोलता येतात.
केवळ ती स्वतःच मराठी बोलायला शिकते असे नसून ती अन्य विदेशी साधकांनाही मराठी बोलायला शिकवते.’
२. सद्गुरु सिरियाक वाले
सद्गुरु सिरियाक वाले रामनाथी आश्रमात रहात असतांना त्यांना आपण दूरभाष केल्यास ते ‘नमस्कार ! मी सिरीयाक बोलतो’, असे मराठीत बोलायचे. त्यांची मुलगी कु. अनास्तासिया हिला मराठी आणि कोकणी भाषाही चांगल्या प्रकारे बोलता येतात.
३. श्री. अॅलन हार्डी आणि श्री. पीटर
श्री. अॅलन हार्डी आणि श्री. पीटर हे दोघेही मराठीतील काही वाक्ये बोलण्यास शिकत आहेत.’
– कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.८.२०२०)