तणावग्रस्त प्रसंगात शांत रहाता आल्याने एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. सायमन ह्यूस यांना स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व लक्षात येणे
१. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे घरी पोचण्यास विलंब होणे
‘जानेवारी २०२० मध्ये एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने रामनाथी आश्रमात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेनंतर मी विमानाने ऑस्ट्रेलियातील ‘अॅडलेड’मधील माझ्या घरी जाण्यास निघालो. सर्वसाधारणपणे माझा हा विमानप्रवास सुरळीत होतो आणि मी ठरल्याप्रमाणे वेळेत घरी पोचतो; परंतु या वेळी मुंबईहून क्वालालंपूरला जाणार्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान वेळेत सुटू शकले नाही. ‘मलेशियन एअरलाईन्स’ची मुंबई ते क्वालालंपूर ही विमान उड्डाणे अल्प प्रमाणात असतात आणि ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी गर्दीचा मोसम असल्याने इतर विमानांमध्ये जागा नव्हती. परिणामी मुंबईहून निघण्यास विलंब झाला आणि प्रवासातील अन्य जोड विमानेही चुकली. त्यामुळे मला घरी पोचायला जवळजवळ तीन दिवस अधिक लागले.
२. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व लक्षात येऊन शरणागतभावाने देवाला प्रार्थना करणे
या प्रसंगात कार्यशाळेत शिकलेल्या स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचा मला अनेक प्रकारे लाभ झाला आणि पुष्कळ चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. ‘सर्वप्रथम ही परिस्थिती पालटता येणार नाही, हे मी स्वीकारले पाहिजे, तसेच मी स्वीकारण्याच्या आणि शिकण्याच्या स्थितीत राहू शकलो, तर हा प्रसंग तणावग्रस्त न रहाता मी सकारात्मक राहू शकेन’, हे माझ्या लक्षात आले. त्यानंतर ‘देवच माझी काळजी घेत आहे’, हे मी आठवत राहिलो आणि ‘देवा तुझ्या इच्छेने जे काही घडायचे आहे, ते घडू दे’, अशी शरणागतभावाने प्रार्थना करत राहिलो. देवाच्या इच्छेप्रमाणे प्रसंग कसा घडत जातो आणि मला त्यातून कसे शिकता येईल, याची मला जिज्ञासा होती.
३. विविध प्रसंगांत स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आणि ती शिकवणारे महान गुरु यांच्याविषयी कृतज्ञता वाटणे
देवाच्या कृपेने घडलेल्या मला पुढील प्रसंगात कृतज्ञता वाटली.
अ. मुंबईहून उड्डाण करण्याआधीच विमानातील तांत्रिक बिघाड लक्षात आल्याने पुढील संभाव्य धोका टळला.
आ. या सर्व घटनांमुळे प्रवासाला होणारा विलंब, त्यामुळे सहन करावा लागणारा त्रास आणि पुढे काय होणार ? याविषयीची अनिश्चितता या सर्व प्रसंगांत केवळ स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेमुळे मला शांत अन् तणावरहित रहाता आले.
इ. काही प्रवासी वेड लागल्यासारखे वागत होते, काही भ्रमणभाषवर ओरडत होते, तर काही विमान आस्थापनांच्या कर्मचार्यांशी भांडत होते. मी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवली नसती, तर मीही त्यांच्याप्रमाणेच एक तणावग्रस्त आणि परिस्थिती स्वीकारता न आल्याने हतबल झालेला प्रवासी झालो असतो, याची मला जाणीव झाली.
ई. या प्रवासात नवीन मित्र मिळाले आणि कठीण प्रसंगामध्ये पूर्ण अनोळखी लोक कसे जवळ येतात, हे अनुभवायला मिळाले.
उ. प्रक्रियेमुळे मी या प्रसंगाकडे साक्षीभावाने पाहू शकलो. परिणामी मला पुष्कळ हलके आणि आनंदी वाटत होते.
४. शिकण्याच्या स्थितीत राहिल्याने गोवा ते अॅडलेड हा संपूर्ण प्रवास, एक विलक्षण अनुभव वाटणे
मला तणावग्रस्त प्रवासी आणि विमान आस्थापनांचे कर्मचारी यांच्याविषयी सहानुभूती वाटत होती. त्यांना पाहून नकारात्मक आणि तणावपूर्ण भावनांमध्येे अडकल्यावर कशी स्थिती होते, या पूर्वानुभवाचे स्मरण झाले. या सर्वांतून मुक्त केल्याविषयी परात्पर गुरु डॉक्टर आठवले आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया यांविषयी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘संपूर्ण प्रवास हा एक विलक्षण अनुभव होता’, हे घरी पोचल्यावर माझ्या लक्षात आले. या प्रवासात स्थुलातून पुष्कळ त्रास झाला, तरी तणावाचे प्रमाण अत्यल्प होते आणि शांतही रहाता आले. या प्रसंगाकडे मला साक्षीभावाने पहाता आले आणि अमूल्य शिकवणही मिळाली. प्रसंगाला सामोरे जातांना ‘तो घडायलाच नको होता’, असा विचार न येता त्याविषयी मला कृतज्ञताच वाटली. घरी आल्यावर मला निवांत आणि उत्साही वाटत होते.
स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया शिकवून, ती माझ्याकडून करून घेतल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले आणि देव यांच्याप्रती कृतज्ञता !’
– श्री. सायमन ह्यूस, अॅडलेड, ऑस्ट्रेलिया. (१२.१.२०२०)