पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी मनुष्य आणि मनुष्यजन्म यांविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !
भाग 2 वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/450938.html
१. पशूपक्षी आणि माणूस यांतील भेद
‘कोंबडी, कुत्री आपल्या पिलांना लहानपणी फार जपतात, त्यांची काळजी घेतात आणि पिलांवर फार माया करतात. गाय आपल्या वासराला सारखी चाटते; परंतु मोठी झाल्यावर ते सोडून देतात, सांभाळत नाहीत. माणूस मोठा झाला, त्याला मिशा आल्या तरी माता-पिता त्याला सोडून देत नाहीत. पशूपक्षी मोठे झाल्यावर नाते विसरतात, माणूस नाते लक्षात ठेवतो; परंतु आई-बापाने मुलाला बायको आणून दिल्यावर पुत्राची आपल्या जन्मदात्यावरची माया ५० टक्के अल्प (कमी) होतेच.’
१ अ. प्राण्यांपेक्षाही माणूस हा वाईट प्राणी असणे : ‘सर्व प्राण्यांत माणूस घातकी आहे. कुत्री, मांजरे, गायी, वाघ आणि सिंह त्यांची वेळ आल्याविना आपल्या नारीला भोगत नाहीत. ते ईश्वराची मर्यादा पाळतात. माणूस या मर्यादा पाळत नाही. त्यामुळे सर्व प्राण्यांत माणूस वाईट आहे.’
१ आ. माणूस अरण्यातील हिंस्त्र पशूंपेक्षाही भयंकर असणे : मला एका माणसाने ‘जंगलात रहाणारे वाघ-सिंह हे भयंकर कि माणूस भयंकर ?’, असा प्रश्न केला, तेव्हा मी त्याला उत्तर दिले, ‘‘माणूस भयंकर प्राणी आहे. रानावनातील प्राणी चांगले आहेत. त्यांच्यातही चांगले गुण आहेत. त्यांच्यामध्ये माणसाएवढे दोष नाहीत. आता हे पहा, माणूस लबाड, लुच्चा, फसवा आणि बुडवा आहे, तसा जंगलातील प्राणी नाही. असे हे दोष माणसांमध्ये आहेत; म्हणून ‘वाघ-सिंह चांगले आणि माणूस भयंकर प्राणी आहे’, असे मला वाटते.’’
२. मनुष्यजन्म
प्राणीयोनी या भोगयोनी आहेत, तर मनुष्याचा जन्म हा साधनेसाठीच होतो.
२ अ. गुणकर्मानुसार चौर्याऐंशी लक्ष फेरे फिरून शेवटी मनुष्यजन्म मिळणे
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक २३
अर्थ : या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही.
गीतेमध्ये म्हटल्याप्रमाणे आपल्या शरिरातील आत्म्याला शस्त्रे तोडू शकत नाहीत, वारा सुकवू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही आणि पाणी भिजवू शकत नाही. फुलांचा सुगंध जसा वायू घेऊन जातो, तसा मृत्यूच्या वेळी या देहाचा सुगंध (गुण) आत्मा घेऊन जातो आणि पुन्हा नवा देह धारण करतो. कर्म असेल, तशी पुन्हा योनी मिळते’, असे चौर्याऐंशी लक्ष फेरे फिरून शेवटी मनुष्य जन्म मिळतो.’
२ आ. मनुष्यजन्म मिळणे दुर्मिळ असल्याने देहाचे सोने करून मिळालेला जन्म सार्थकी लावा ! : ‘देवांचे ग्रंथ आणि शास्त्र वाचायची आवड निर्माण करा, तरच तुमच्यावर ईश्वराची कृपा होईल. त्यामुळे तुम्हाला आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान होऊन तुमच्या जीवनाचे कल्याण होईल. प्रतिदिन अनावश्यक गप्पा मारून स्वतःचे आयुष्य घालवण्यापेक्षा ईश्वराच्या कथा असणारे ग्रंथ वाचून पुण्य कमवा. मृत्यूनंतर वरती गेल्यावर देव विचारील, ‘तुमचे पुण्य किती साठले आहे ?’ तेव्हा तुमच्याजवळ काहीच नसेल. मनुष्यजन्म मिळणे दुर्मिळ आहे; म्हणून देहाचे सोने करा. पुन्हा अशी संधी चालून येणार नाही; म्हणून मिळालेला जन्म सार्थकी लावा.’
३. मनुष्यजन्म मिळण्यामागील कारणे आणि त्यासाठी देवाने दिलेल्या सुविधा
३ अ. दुसर्यांना आनंद देण्यासाठी जन्म झालेला असणे : ‘एका माणसाला विचारले, ‘‘बाबा, माणसाचा जन्म कशासाठी होतो ?’’ त्याने उत्तर दिले, ‘‘एकमेकांना पिडण्यासाठी !’’ सध्याच्या स्वार्थी प्रवृत्तीमुळे भांडणे, पुष्कळ मतभेद आहेत. कुठेही भाऊबंद एकत्र नाहीत. बाप-लेक एकत्र नांदत नाही. तुम्ही दुसर्यांना साहाय्य करा. देव तुमच्या साहाय्यासाठी धावून येईल. आपला जन्म दुसर्यांना आनंद देण्यासाठी झालेला आहे, दुसर्यांना दुःख देण्यासाठी नाही.’
३ आ. देवाने केवळ माणसालाच इतर प्राण्यांपेक्षा भरपूर सुविधा दिल्या असणे : ‘इतर प्राण्यांपेक्षा देवाने माणसाला भरपूर सुविधा दिल्या आहेत. इतर प्राणी जेवतांना समवेत पाण्याचा तांब्या कुठे ठेवतात ? माणसाला जेवतांना तोंडी लावायला आणि चवीसाठी भाजी-आमटी मिळते. माणसाला मिळणारे तळलेले वडे, श्रीखंड-पुरी आणि पुरणपोळ्या, असे जेवण पशू-पक्षांना कुठे मिळते ? ही मजा केवळ देवाने माणसासाठी केली आहे.’
३ इ. ‘प्रत्येक माणसाला स्मशान-वैराग्य, प्रसूती-वैराग्य आणि ज्ञान-वैराग्य, अशी तीन वैराग्ये येतात.’
(क्रमशः पुढील रविवारी)
– पू. सखाराम रामजी बांद्रे (वय ७० वर्षे), कातळवाडी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (पू. सखाराम बांद्रे महाराज यांचे हे लिखाण वर्ष २००५ ते २०२० या कालावधीतील आहे.)
दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील धर्मशिक्षणाच्या विचारांचा प्रसार होण्यासाठी परिचयातील व्यक्तींना वर्गणीदार करणारे पूज्य (ह.भ.प.) बांद्रे महाराज !‘सावर्डे (ता. चिपळूण) येथील संत पूज्य (ह.भ.प.) बांद्रे महाराज हे संतपदी विराजमान झाल्याप्रीत्यर्थ ३१.१.२०२१ या दिवशी त्यांचा सनातन संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यानंतर दुसर्याच दिवशी (२ फेब्रुवारी २०२१ या दिवशी) त्यांच्याकडून एक वैशिष्ट्यपूर्ण कृती दिसून आली. पूज्य (ह.भ.प.) बांद्रे महाराज आणि त्यांचे बंधू सनातनचे साधक श्री. शिवराम बांद्रे यांनी येथील बाजारपेठेत जाऊन ७ जणांना रविवारच्या दैनिक ‘सनातन प्रभात’साठी वर्गणीदार केले. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचार, धर्मशिक्षणाचे विचार यांचा प्रसार व्हावा आणि ‘सनातन प्रभात’ मधील चैतन्याचा सर्वांना लाभ व्हावा’, या विचाराने त्यांनी ही कृती केली. या वेळी पूज्य (ह.भ.प.) बांद्रे महाराज हे ज्यांच्याकडे गेले, ते सर्व जण वर्गणीदार झाले. पू. महाराज त्यांच्याकडे जाऊन केवळ उभे राहिले. त्यांनी विशेष काहीही न सांगता समाजातील व्यक्ती वर्गणीदार झाल्या. या प्रसंगामुळे ‘समाजात पूज्य (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांना किती आदराचे स्थान आहे’, हे पहायला मिळाले. त्यांच्यामध्ये पूज्य (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. सर्वजण त्यांना आदराने बसण्यास सांगत होते.’ पूज्य (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांची निर्मोही वृत्ती !‘पूज्य (ह.भ.प.) बांद्रे महाराज हे संतपदी विराजमान झाल्यावर सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी पूज्य (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांचा पुष्पहार घालून, तसेच श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. या प्रसंगी पूज्य (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांचा निर्मोहीपणा दिसून आला. पूज्य (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांना देण्यात आलेले अर्पणस्वरूपी भेट असलेली वस्तू त्यांनी परत धर्मकार्यासाठी सनातन संस्थेकडे सुपूर्द केली. पूज्य (ह.भ.प.) बांद्रे महाराज कुणाकडूनही काही घेत नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यात त्यांनी ६०० प्रवचने घेतली; परंतु कुणाकडूनही मानधन घेतलेले नाही.’ – श्री. शिवराम बांद्रे, सावर्डे, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. |