जत्रा, यात्रा, उरुस भरवण्यास मनाई; केवळ धार्मिक विधी करण्यास अनुमती ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली
सांगली, १९ फेब्रुवारी – सांगली जिल्ह्यातील धार्मिक यात्रा, जत्रा, उरुस यांमधील केवळ धार्मिक विधी करण्यास जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी अनुमती दिली आहे. जिल्ह्यात जत्रा, यात्रा, उरुस भरवण्यास मनाई केली आहे. उपविभागीय दंडाधिकारी यांनी ज्या ठिकाणी धार्मिक विधी होणार आहे, त्या ठिकाणचे पर्यवेक्षण करून नियंत्रण ठेवावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.
सद्यस्थितीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात मंगल कार्यालय, तसेच इतर ठिकाणी कार्यक्रम चालू असून मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी केली जात आहे. त्या अनुषंगाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होत असल्याविषयीची पडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. शासकीय यंत्रणांनी त्यांच्या स्तरावर पथके सिद्ध करून त्यांच्या कार्यक्षेत्रातील मंगल कार्यालये, खासगी शिकवणीवर्ग, बाजार, मंडई, उपहारगृह, तसेच अन्य गर्दीच्या ठिकाणी मर्यादित लोकांची उपस्थिती, मास्क, सॅनिटायझर यांचा वापर, योग्य सामाजिक अंतर याची पडताळणी करावी. याचे पालन न करणार्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.