शिवकालीन गड-किल्ले जगाच्या पटलावर आणण्यासाठी सरकारचा प्रयत्न राहील ! – अमित देशमुख, सांस्कृतिक कार्यमंत्री
शिवकालीन गड-किल्ले विदेशात असते, तर विदेशींनी त्याचा संपूर्ण कित्ता जगभर पसरवला असता, हे लक्षात घ्या !
संभाजीनगर – शिवकालीन गड-किल्ल्यांना जगाच्या पटलावर आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे. शिवकालीन गड-किल्ल्यांवर शिवरायांनी गनिमी काव्याचा अवलंब करून मिळवलेला विजय हा युद्धनीतीचा एक अभूतपूर्व नमुना असून या युद्धतंत्राची ओळख जागतिक स्तरावर व्हावी, यासाठी युनेस्कोकडे (युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अॅण्ड कल्चरल ऑर्गनायझेशन) शिफारस करण्यात आलेली आहे. भारत सरकारकडेही या अनुषंगाने प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. राज्य सरकारच्या अखत्यारितील गड-किल्ल्यांची देखभाल आणि संवर्धन व्हावे, यासाठी स्थानिक जिल्हाधिकार्यांनाच प्राधिकृत करण्याचा विचार चालू आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी १८ फेब्रुवारी या दिवशी दिली. (आतापर्यंत अनेक लोकप्रतिनिधींनी गड-किल्ल्यांच्या संवर्धनाविषयी पोकळ आश्वासने दिली आहेत. प्रत्यक्षात कृतीच्या स्तरावर कुणाकडूनही प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे विद्यमान शासनाने नुसते संवर्धन आणि देखभाल असे बोलाचे शब्द बोलून दाखवण्याऐवजी प्रत्यक्षात गड-किल्ले यांची जगाच्या पटलावर ओळख होण्यासाठी कृतीच्या स्तरावर प्रयत्न करून दाखवावेत, अशीच शिवप्रेमींची अपेक्षा आहे. – संपादक)
ते पुढे म्हणाले की, शिवकालीन गड-किल्ले यांविषयी महाविकास आघाडी सरकार गंभीर आहे. प्राचीन मंदिरांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठीही भरीव निधी देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे. मागच्या काळातही येथे जो विकास झाला तो महाराष्ट्र शासनाच्याच पुढाकाराने झाला आहे.
मराठवाडा येथे २० किल्ले आहेत. त्यांतील ७५ टक्के किल्ले हे राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडे आहेत. या किल्ल्यांची देखभाल करण्यासाठी मनुष्यबळही अपुरे पडत आहे. परिणामी दैदीप्यमान इतिहासाची साक्ष देणार्या गड-किल्ल्यांची पडझड होत असल्याकडे दुर्लक्ष होत आहे. (आतापर्यंत शासनाने गड-किल्ल्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांची पडझड झाली आहे. याला आतापर्यंत उत्तरदायी असणारे संबंधित लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. – संपादक) शासनाने गड-किल्ल्यांचे संवर्धन योग्य वेळेत करून जगाच्या पटलावर गड-किल्ल्यांची ओळख करून दिली असती, तर अनेक देशांतून किल्ल्यांच्या विकासासाठी कितीतरी निधी मिळाला असता.
संभाजीनगरजवळील वेरूळ येथीलही मालोजी राजे भोसले यांची गढी म्हणून ओळख असलेल्या ठिकाणीही आता केवळ अवशेषच शिल्लक आहेत. मालोजी राजे भोसले हे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा. त्यांच्याच नावाने ओळखली जात असलेल्या गढीच्या ठिकाणी सध्या मातीचे ढिगारे आहेत. याच ठिकाणी शहाजी राजे यांचाही एक पुतळा आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने उभारण्यात आलेला हा पुतळा असला, तरी मालोजी राजे गढीचे जतन होण्याच्या दिशेने दुर्लक्षच होत आहे. (शिवकालीन गड-किल्ले आणि त्या गडावर वास्तव्य केलेल्या राष्ट्रपुरुषांच्या कार्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करणारा जगातील एकमेव देश भारत ! – संपादक)