उत्पादनांच्या वेष्टनावरील हनुमानाचे चित्र न हटवल्यास आंदोलन करणे भाग पडेल ! – न्याय निवाडा लोकनेता फाऊंडेशनच्या वतीने श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषीपूरक सेवा संस्थेला निवेदन
हुपरी (जिल्हा कोल्हापूर), १९ फेब्रुवारी (वार्ता.) – श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक व कृषीपूरक सेवा संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेच्या विविध उत्पादनांवर श्री हनुमानाचे चित्र मुद्रित करण्यात आले आहे. या उत्पादनांची वेष्टने यांचा वापर करून झाल्यावर ती रस्ता, कचरा, तसेच अन्यत्र टाकून दिली जातात. यामुळे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री हनुमान देवतेची विटंबना होऊन हिंदूंच्या भावना दुखावल्या जातात. तरी या निवेदनाची नोंद घेऊन आपण आपल्या उत्पादनांच्या वेष्टानावरील श्री हनुमानाचे चित्र हटवावे; अन्यथा आम्हाला आंदोलन करणे भाग पडेल, असे निवेदन १८ फेब्रुवारी या दिवशी न्याय निवाडा लोकनेता फाऊंडेशनच्या वतीने श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक व कृषीपूरक सेवा संस्थेच्या सचिवांना देण्यात आले.
या वेळी राष्ट्रीय निरीक्षक संग्रामसिंह जाधव, पश्चिम महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष नरेंद्र गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अनिल कोरवी, आरोग्य जिल्हाध्यक्ष डॉ. प्रशांत निर्मळे, हुपरी शहर महिलाआघाडी उषा ऐतवडे, सद्गुरु बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गायकवाड, हुपरी येथील सामाजिक कार्यकर्ते शेखर गोसावी उपस्थित होते.