समग्र मानव जीवनाचे विज्ञानच साकारलेला दासबोध ग्रंथ !
२१ फेब्रुवारी २०२१ या दिवशी दासबोध जयंती आहे. या निमित्ताने…
येथे बोलिला विशद । भक्तिमार्ग ॥ असे समर्थांनीच ग्रंथाच्या आरंभी म्हटलेले असल्यामुळे या ग्रंथाचा मुख्य विषय भगवद्भक्ती हा आहे, हे स्पष्टच आहे. समर्थांचा स्थायीभाव प्रामुख्याने दास्यभक्ती हा असल्यामुळे प्रभु रामचंद्रांच्या दासाने आपल्या शिष्यांना केलेला बोध म्हणजे उपदेश, हा तर दासबोध शब्दाचा अर्थ आहेच; पण श्रीरामाची दास्यभक्ती करण्याचा भक्तांना केलेला उपदेश, असाही याचा अर्थ आहे. हा ग्रंथ आणि संप्रदाय यांतील भक्ती ही शंकराचार्यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानावर उभी आहे अन् भागवतातील भक्तीप्रक्रियांनी ती अलंकृत आहे. या भक्तीचा प्रपंचाशी केवळ अविरोधच नाही, तर प्रपंच नेटका करण्याचा आग्रह आहे. उत्कट भक्तीने परमार्थ कसा करावा ? याचे जसे मार्गदर्शन यात आहे, तसे दक्षतेने प्रपंच कसा यशस्वी करावा ? याचीही सर्व सूत्रे या ग्रंथात उपलब्ध आहेत. प्रपंच असो वा परमार्थ, दोन्ही आघाड्यांवर समर्थ प्रयत्नवादाचे प्रखर पुरस्कर्ते आणि दैववादाचे खंडणकर्ते आहेत. यत्न तो देव जाणावा, असे म्हणून त्यांनी प्रयत्नवादाला परमेश्वरी स्तरावर मान्यता दिली आणि अचूक यत्न करावा, असे म्हणून प्रयत्नवादाचे मर्मही सांगितले. विवेक आणि वैराग्य हे समर्थ-विचारांचे प्रिय सांगाती असून, प्रयत्न, प्रचीती आणि प्रबोध या त्रिसूत्रीने या ग्रंथात समग्र मानवजीवनाचे विज्ञानच साकार केले आहे.
– प.पू. स्वामी गोविंददेव गिरि, पुणे.
(संदर्भ : दासबोध (गद्य रूपांतरासह), गीताप्रेस, गोरखपूर)