कोरोनाशी लढतांना छत्रपती शिवरायांची प्रेरणा आणि जिद्द आम्हाला मिळते ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
शिवनेरी येथे शिवजयंती सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गौरवोद्गार !
मुंबई – छत्रपती शिवराय आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत. छत्रपती दैवत का आहेत, तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती. कोरोनाशी लढतांना ही प्रेरणा आणि जिद्द आम्हाला मिळत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. १९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी किल्यावर शासनाच्या वतीने साजर्या करण्यात आलेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. संपूर्ण जगात शिवरायांचे तेज पसरवणार असल्याची मनीषाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी बोलून दाखवली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार छत्रपती संभाजीराजे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. या वेळी ‘शिवयोग’ या टपालाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘आपल्या प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती शिवरायांचे स्थान अढळ आहे. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत रहाते. नुसती हातात तलवार घेतली म्हणजे युद्ध जिंकता येत नाही. काही साप आहेत. ते वळवळ करत आहेत. त्यांना ठेचायचे असते आणि आपण पुढे जायचे असते. महाराजांच्या काळातील युद्ध आपल्याला करावे लागत नसले, तरी कोरोनाशी आपले युद्ध चालू आहे. त्यासाठी ‘मास्क’ हीच आपली ढाल आहे.’’
किल्ला संवर्धन आणि जतन यांसाठी शासनाने मोहीम हाती घ्यावी ! – खासदार छत्रपती संभाजीराजे
समुद्रातील किल्ल्यांवर वाहतूक व्यवस्था करून शासनाने पर्यटनाला गती द्यावी. शासनाने किल्ला संवर्धन आणि जतन याविषयी मोहीम हाती घ्यावी.
असा झाला सोहळा !
प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायला. पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. आदिवासी पारंपरिक नृत्याचे सादरीकरण झाले. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्य मंत्री पवार यांनी बालशिवाजी आणि जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.