…तर कोरोनाची लाट नव्हे, तर लाटा येतील ! – डॉ. संजय ओक, अध्यक्ष, राज्य कृती दल
मुंबई – मागील काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढतांना दिसत आहेत. याला लोक तसेच राजकारणी उत्तरदायी आहेत. राजकीय मेळावे, लग्नसमारंभ तसेच बहुतेक सर्वत्र लोक मास्क वापरत नाहीत आणि सुरक्षित अंतरही ठेवत नाहीत. परिस्थिती अशीच राहिल्यास कोरोनाची लाट नव्हे, तर लाटा येतील, अशी चेतावणी कोरोनाच्या विरोधात नियुक्त करण्यात आलेल्या राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी दिली आहे.
या वेळी डॉ. संजय ओक म्हणाले,
१. ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी प्रचंड धुरळा उडवला. त्यासाठी राजकीय पक्षांनी जागोजागी मेळावे घेतले. निवडणूक निकालानंतरही हा जल्लोष चालू होता. या सर्वांत कुठेही सुरक्षित अंतर वा मास्क वापरण्याचे पालन झाले नव्हते.
२. लग्नसमारंभ तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमात सरकारने लागू केलेल्या कोणत्याही नियमांचे पालन होतांना दिसत नाही.
३. मुंबईत लोकल प्रवास सर्वांसाठी चालू झाला आहे. मंदिरापासून हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट मोठ्या प्रमाणात चालू आहेत. यातूनच पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.
एका रुग्णामागे संपर्कातील २० लोकांना शोधण्याचे आदेश शासनाने दिला आहे. त्याचेही कुठे पालन होतांना दिसत नाही.
४. आम्ही राज्य कृती दल म्हणून या सर्व गोष्टी सरकारच्या निदर्शनास आणल्या आहेत. यावर कठोर कारवाई केली नाही, तर कोरोनाची दुसरी लाट आल्याविना रहाणार नाहीत.
५. ज्या प्रमाणात लसीकरण व्हायला हवे तेवढे होत नाही, हे दुर्दैवी आहे. आरोग्यक्षेत्रातील लोकांमध्ये अवघे ५५ टक्के लसीकरण झाले आहे चुकीचे आहे. यातून चुकीचा संदेश गेला आहे.
६. लसीकरणाविषयी धरसोड धोरण असता कामा नये. सर्वांना लस लवकरात लवकर उपलब्ध करून दिली पाहिजे. सरकारचे यावरील नियंत्रण उठवून खासगी क्षेत्राच्या कह्यात लसीकरण दिले पाहिजे.