स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही पांगारे (जिल्हा सातारा) ग्रामस्थ बससेवेपासून वंचित
सातारा, १९ फेब्रुवारी (वार्ता.) – भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली. तरीही पांगारे (जिल्हा सातारा) येथील ग्रामस्थ बससेवेपासून वंचित आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थ, विद्यार्थी, नोकरदार आदींची मोठी फरपट होत आहे. परिसरातील इतर वाड्या-वस्त्या यांवर बससेवा पोचली; मात्र पांगारे गावात आजपर्यंत बस पोचली नाही. एस्.टी. महामंडळाकडून पांगारे गावाला सापत्न भावाची वागणूक का दिली जात आहे ?, असा प्रश्न पांगारे ग्रामस्थ विचारत आहेत. पांगारे गावासाठी तातडीने बस सेवा चालू करावी, अन्यथा जनआंदोलन उभारले जाईल, अशी चेतावणी उपसरपंच गोपीचंद पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. (स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही जनतेसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करू शकत नाहीत, हे प्रशासनासाठी लज्जास्पद आहे. बससेवा चालू करण्यासाठी प्रशासन आंदोलनाची वाट पहात आहे का ? – संपादक)