२०१२ मध्ये सापडलेल्या सांगाड्यांच्या प्रकरणी आता खुनाचा गुन्हा नोंद
गुन्हा नोंद होण्यासच ८ वर्षे लागत असतील, तर संबंधितांना कधी न्याय मिळेल, हे स्वप्नवतच वाटते !
हिंगोली – वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील ३३ केव्ही उपकेंद्राच्या पाठीमागे असलेल्या न वापरल्या जात असलेल्या पाण्याच्या टाकीत २ मानवी सांगाडे आढळून आले होते. या प्रकरणी पोलिसांनी ८ वर्षांनंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध कुरुंदा पोलीस ठाण्यात १८ फेब्रुवारी या दिवशी खुनाचा गुन्हा नोंद केला. १४ नोव्हेंबर २०१२ या दिवशी क्रिकेट खेळणार्या काही मुलांना हे २ सांगाडे निदर्शनास आले होते. या प्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती.
पोलिसांच्या अन्वेषणात गावातील साईनाथ पुंजाजी इंगोले (वय २५ वर्षे) हे बेपत्ता असल्याने १ मृतदेह त्यांचाच असल्याचे स्पष्ट झाले, तर दुसरा मृतदेह कोणाचा हे स्पष्ट झाले नाही. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळावरील सांगाड्याचे काही नमुने पडताळणीसाठी अंबाजोगाई येथील वैद्यकिय महाविद्यालयात पाठवले होते. त्यानंतर १ सांगाडा पुरुषाचा, तर १ सांगाडा महिलेचा असून दोघांच्या सांगाड्याची काही हाडे फ्रॅक्चर असल्याचेही अहवालात म्हटले होते. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी गावांतूनच काही माहिती घेण्याचा प्रयत्न चालवला होता.