शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे रायगडावर विद्युत् रोषणाई !
मुंबई – शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी १५ फेब्रुवारी या दिवशी रायगडला भेट दिली असता रायगडावरील महत्त्वपूर्ण वास्तू, छत्रपती शिवरायांची मूर्ती अंधारात असल्याचे निदर्शनास आले. या विषयी डॉ. शिंदे यांनी पुरातत्व विभागाचे अधीक्षक राजेंद्र यादव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विद्युत् रोषणाई करण्यासाठी आवश्यक निधी नसल्याचे सांगितले. त्या वेळी डॉ. शिंदे यांनी यासाठी लागणारा निधी मी देतो मात्र रायगड अंधारात ठेवू नका, असे सांगितले आणि तशा मागणीचे पत्र दिले. यानंतर १७ फेब्रुवारी या दिवशी डॉ. शिंदे यांच्याकडून रायगडावर विद्युत् रोषणाईचे साहित्य पोच करण्यात आले. यामुळे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १८ फेब्रुवारी या दिवशी रायगड प्रकाशमान झाला.
(सौजन्य : TV9 Marathi)
रायगडावर आता प्रतिदिन पुष्पहार अर्पण होणार
रायगडावरील राजसदर (दरबार), होळीचा माळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आणि समाधीस्थळ यांना प्रतिदिन पुष्पहार अर्पण करण्याचा संकल्प खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. शिवजयंतीपासून हा संकल्प चालू करण्यात आला आहे.
रायगडावर केलेल्या विद्युत् रोषणाईने महान वारशाचा अपमान ! – छत्रपती संभाजीराजे भोसले, कोल्हापूर
कोल्हापूर – भारतीय पुरातत्व विभागाने शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला केलेल्या प्रकाशयोजनेमुळे महान वारशाचा अपमान झाला आहे. ही विद्युत् रोषणाई विचित्र स्वरूपाची झाली आहे. हा दिवस भारतीय पुरातत्व विभागाच्या इतिहासात काळा दिवस म्हणून गणला जाईल. पुरातत्व विभागाचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबेरंगी प्रकाश योजना वापरून हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून या प्रकाराचा मी तीव्र निषेध करतो, असे परखड मत कोल्हापूर येथील खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी फेसबूक पोस्टद्वारे व्यक्त केले आहे.