इन्क्विझिशनचा २७५ वर्षांचा काळ हा गोव्याच्या इतिहासातील अत्यंत कठीण काळ ! – अधिवक्ता उदय भेंब्रे, कोकणी साहित्यिक
कोकणी साहित्यिक अधिवक्ता उदय भेंब्रे यांच्या व्हडलें घर या पोर्तुगिजांच्या क्रूर इन्क्विझिशनवर आधारित कादंबरीचे प्रकाशन
पणजी, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – गोव्याच्या इतिहासात इन्क्विझिशनचा २७५ वर्षांचा काळ हा गोव्याच्या इतिहासातील अत्यंत कठीण काळ होता. इन्क्विझिशनमुळे अनेक कुटुंबांनी गोव्यातून पलायन केले, तर अनेकांचे धर्मांतर करण्यात आले. इन्क्विझिशनची सर्व माहिती केवळ एका कादंबरीत सीमित करता येणार नाही. नागरिकांनी इतिहास शिकावा आणि वस्तूस्थितीपासून दूर जाऊ नये, असे आवाहन कोकणी साहित्यिक तथा अधिवक्ता उदय भेंब्रे यांनी केले.
कोकणी साहित्यिक उदय भेंब्रे यांनी लिहिलेल्या इन्क्विझिशनवर आधारित व्हडलें घर या कादंबरीचे प्रकाशन इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात नुकतेच पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. पुस्तकाचे प्रकाशक संजना पब्लिकेशन यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे या नात्याने नामवंत हृदयरोगतज्ञ तथा साहित्यिक डॉ. कस्तुरी मोहन पै, सन्माननीय अतिथी म्हणून डॉ. रमिता गुरव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आजच्या अनेक प्रश्नांवरही इतिहासात उत्तरे सापडू शकतात !
कोकणी साहित्यिक उदय भेंब्रे प्रस्तावना करतांना पुढे म्हणाले, इतिहास का उकरून काढत आहे ? इतिहासामुळे पोट भरते का ? असे काही जण प्रश्न उपस्थित करतात. इतिहासातून बोध घ्यायचा असतो आणि इतिहास उपाय सुचवत असतो. आजच्या अनेक प्रश्नांवरही इतिहासात उत्तरे सापडू शकतात.
इन्क्विझिशन झालेच नाही असे म्हणणे चुकीचे !
इन्क्विझिशनचा काळ हा २७५ वर्षांचा आहे. गोमंतकीय जुझे निकोलांव द फोन्सेका यांनी द स्कॅच ऑफ द सीटी ऑफ गोवा हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात लेखक म्हणतात, १८ व्या शतकात इन्क्विझिशनसाठी वापरण्यात येत असलेली इन्क्विझिशन पॅलस ही इमारत कोसळू लागली होती. इमारतीचे दगड दुसर्या इमारतीच्या कामासाठी वापरण्यात आल्याने इमारत आणखी ढासळली. जुने गोवे येथील सेंट कॅथॅड्रलच्या उजव्या कोपर्यात ही दगड आणि माती होती. सेंट झेवियरच्या शवाचे गोव्यात पहिले प्रदर्शन झाले, तेव्हा या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. ही स्वच्छता करतांना स्वच्छता कामगारांना त्या ठिकाणी पायर्या दिसल्या. पायर्या उतरून खाली गेल्यानंतर त्यांना आतमध्ये अनेक मानवी सांगाडे सापडले. याविषयी पुढे संशोधन झाले नाही किंवा या ठिकाणी खोदकाम करण्यात आले नाही. याचा अर्थ इन्क्विझिशन झालेच नाही, असा होत नाही. (हे आहे जुने गोवे येथील पर्यटनस्थळाचे ऐतिहासिक सत्य ! गोवामुक्तीच्या ७० वर्षांत पुरातत्व खात्याने हे सत्य शोधून काढण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. याचे एकमेव कारण राजकारण्यांकडून झालेले ख्रिस्त्यांचे लांगूलचालन हेच आहे. ज्या सेंट झेवियरने गोव्यात इन्क्विझिशन आणण्याविषयीचे पत्र पोर्तुगालमधील सरकारला लिहिले, त्याचेच आज गोंयचो सायब (गोव्याचा साहेब) म्हणून आणि एक संत संबोधून उदोउदो केला जातो, हे घृणास्पदच ! – संपादक)
इन्क्विझिशनची सर्व माहिती सांगायला कांदबरीची माळ करावी लागेल !
माझ्या व्हडलें घर या पुस्तकात इन्क्विझिशनमधील २० वर्षांचा काळ म्हणजेच १५६६ ते १५८५ या वेळेतील प्रसंगांची माहिती आहे; मात्र यापूर्वी आणि त्यानंतर खूप काही घडले आहे. २७५ वर्षांच्या इन्क्विझिशनविषयी सांगण्यास २० वर्षांचा काळ खूप अपुरा आहे. हे सर्व सांगण्यासाठी कादंबर्यांची माळ करावी लागेल. एका कादंबरीत हे सामावू शकणार नाही, असे कोकणी साहित्यिक उदय भेंब्रे म्हणाले.
नव्या पिढीसमोर पोर्तुगीजकालीन इतिहास आणणे काळाची आवश्यकता ! – डॉ. कस्तुरी मोहन पै
नवीन पिढीसमोर आमचे पूर्वज, तसेच पोर्तुगीजकालीन इतिहास आणणे काळाची आवश्यकता आहे. पूर्वजांचा इतिहास शोधण्याची आज आवश्यकता आहे. व्हडलें घर या कादंबरीत हा इतिहास आहे, असे उद्गार डॉ. कस्तुरी मोहन पै यांनी या वेळी काढले. या वेळी डॉ. रमिला गुरव म्हणाल्या, इन्क्विझिशनचा काळ कसा होता याची माहिती कादंबरी वाचल्यानंतर लक्षात येते. सोहळ्यात ऊर्जिता भोबे यांनी सूत्रसंचालन केले, तर संजना पब्लिकेशनचे प्रतिनिधी दिनेश मणेरीकर यांनी आभार व्यक्त केले.