पेट्रोल आणि डिझेल वाढीवर अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे मौन का ? – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
भंडारा – तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग शासनाच्या काळात अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्वीटरच्या माध्यमातून डिझेल-पेट्रोल तेलांच्या वाढत्या किमतींवर बोलत होते; मात्र आता त्यांनी यावर मौन बाळगले आहे. आता या गोष्टींचा विसर पडल्याने भविष्यात अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्रात होऊ देणार नाही, तसेच चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी चेतावणी काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे १८ फेब्रुवारी या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
देशातील पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने १८ फेब्रुवारीपासून राज्यभर आंदोलन चालू केले आहे. नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली येथे आंदोलन करण्यात आले. ते पुढे म्हणाले की, अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी पेट्रोलचा दर ७० रुपये लिटर झाला होता, तेव्हा त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून भाष्य करून मनमोहन सिंग शासनावर टीका केली होती; मात्र आता हा दर १०० रुपये प्रती लिटर झाल्यानंतरही ते गप्प आहेत ? त्यांच्यात मोदी सरकारच्या विरोधात बोलण्याचे धैर्य नाही का ? इंधन दरवाढीनंतरही भाजप नेते शांत कसे ?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.