साधकांवर निरपेक्ष प्रेम करून त्यांना साधनेत साहाय्य करणार्या आणि संतांप्रती भाव असणार्या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. पूनम साळुंखे !
माघ शुक्ल पक्ष नवमी (२१.२.२०२१) या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणार्या कु. पूनम साळुंखे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सहसाधिकेला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. पूनम साळुंखे यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. प्रथम भेटीतच मनातील विचारांवर कशी मात करू शकते ?, हे सहजतेने सांगणे आणि पहिली भेट आध्यात्मिक स्तरावर झाल्याने पुष्कळ आनंद मिळणे
कु. पूनमताई सद्गुणांची खाण आहेे. मी आरंभी तिला ओळखत नव्हते. मी आश्रमात नवीन असल्याने माझ्या मनातील विचार कुणाशी बोलायचे ?, ते मला कळत नव्हते. पूनमताईची आध्यात्मिक पातळी चांगली होती आणि मी तिच्याविषयी दैनिक सनातन प्रभातमध्येही वाचले होते. त्यामुळे मी तिच्याशी धाडस करून बोलले होते. त्यानंतर मला एका संतांचा सत्संग लाभला. तेव्हा त्यांनी मला सांगितले, पूनमची आध्यात्मिक पातळी चांगली आहे. तू तिच्याशी नियमितपणे बोल. तेव्हा माझ्या मनात एका अनोळखी साधिकेशी मी कशी बोलू ? असा विचार आला. मी पुष्कळ प्रयत्न करून तिच्याशी बोलायला गेले. तेव्हा पहिल्या भेटीतच मी ताईशी सहज बोलू शकते, असे मला वाटले. तिने मला पहिल्या भेटीतच कल्याणस्वामींच्या जीवनातील काही प्रसंग सांगितले आणि मी मनातील विचारांवर कशी मात करू शकते ?, हे सांगितले. तिने हे सर्व इतक्या सहजतेने सांगितले की, मी तिच्याशी प्रथमच बोलत आहे, असे मला वाटलेच नाही. मी तिच्याशी बोलल्यावर माझ्या मनातील विचार अल्प झाले. त्यानंतर मी तिच्याशी नियमितपणे बोलू लागले. इथून माझी तिच्याशी ओळख झाली. आमची पहिली भेट आध्यात्मिक स्तरावर झाल्याने मला पुष्कळ आनंद मिळाला.
२. केवळ साधकांवरच नव्हे, तर त्यांच्या नातेवाइकांवरही प्रेम करणे
ताई साधकांवर प्रेम करते, तसेच त्यांच्या नातेवाइकांचीही विचारपूस करते. माझा दादा (श्री. विनोद पालन) २ मासांपूर्वी आजारी होता. तेव्हा ती मला प्रतिदिन दादाची स्थिती विचारायची. त्याला पुष्कळ जप करावे लागायचे. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ कधी त्याला धोका अधिक आहे, असे सांगायचे. तेव्हा ताईने त्याच्यासाठी संतांनी नामजप करायला हवा का ?, असे विचारून घ्यायला सांगितले. त्याप्रमाणे दादासाठी तसा नामजप चालू केला. त्यामुळे त्याला लवकर बरे वाटले. घरी माझे आई-वडील असतात. वडील रुग्णाईत आहेत. ताईने मला प्रत्येक आठवड्याला १ दिवस घरी जाऊन ये. त्यामुळे घरच्यांना बरे वाटेल, असे सांगितले.
३. अंतर्मुख
ताईकडून बोलण्यात वा वागण्यात काही चुका झाल्या असतील, तर ती संबंधितांची क्षमा मागते. अशी चूक होण्यामागे मनात कोणता विचार होता ?, याचे ती चिंतन करते आणि याविषयी ती तिची आध्यात्मिक मैत्रिण कु. सोनल जोशी यांना विचारते. ती तिच्या चुका सहजतेने सांगते आणि विचारूनही घेते. मी तिच्यापेक्षा वयाने आणि साधनेत लहान असूनही ती मला तिच्या चुका विचारते अन् सांगतेही. ती सतत अंतर्मुख असते.
४. साधिकेला साधनेत साहाय्य करणे
मला भावसत्संगात बोलण्याची सेवा मिळाली. तेव्हा माझ्यातील प्रतिमा जपणे आणि आत्मविश्वासाचा अभाव या स्वभावदोषांमुळे मला ती सेवा नीट जमत नव्हती. माझ्या सेवेत पुष्कळ चुका व्हायच्या आणि मनात नकारात्मक विचार यायचे. आरंभी माझी सेवा करण्याची काहीच स्थिती नसायची. प्रतिमा जपणे या स्वभावदोषामुळे मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यासमोर जायला जमत नसे. त्यामुळे मी ताईला सांगितले, मला कोणतीच सेवा जमत नाही. मी केवळ नियमितची सेवाच नीट करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तिने मला समजावले आणि मला अन्य कोणत्याच सेवा करण्याची बळजोरी केली नाही. तिने काही दिवस मला स्वयंसूचना सत्रे करणे, प्रसंगाचा सराव करणे, नामजप आणि भावसत्संग यांवरच लक्ष द्यायला सांगितले. त्यामुळे मी त्या नकारात्मकतेतून बाहेर पडले.
५. भाव
५ अ.श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याप्रती भाव
१. पूनमताईने मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंशी मोकळेपणाने कसे बोलायचे ?, हे सांगितले. तिच्या बोलण्यातून तिच्या अंतरात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंप्रती किती भाव आहे !, हे मला जाणवायचे आणि अनुभवायला मिळायचे. ताई नेहमी म्हणते, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आधीपासून माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत.
२. रामनाथी आश्रमात यज्ञ असतांना पूनमताई यज्ञस्थळी नामजप करण्यासाठी बसायची. तेव्हा काही वेळा तिचे डोळे पाणावलेले असायचे. मी एकदा तिला त्याविषयी विचारल्यावर ती म्हणाली, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई म्हणजे साक्षात् देवीच आहेत, महालक्ष्मीच आहेत. माझ्याकडून कळत-नकळत काही चुका झाल्या असल्यास मी त्यांच्या चरणी क्षमायाचना करते आणि त्यांची कृपा असू दे, अशी प्रार्थना करते. त्यांची कृपा संपादन करण्यासाठी त्यांच्या चरणी नतमस्तक रहायला हवे. हे सांगतांना तिचे डोळे भरून आले होते.
५ आ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याप्रती भाव : एकदा एका चित्रीकरण सेवेमध्ये श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ चालू असलेल्या प्रयोगात अजून काय करायला हवे ?, याविषयी सांगत होत्या. त्या वेळी मला काही सुचत नव्हते आणि सहसाधिकेनेही काही केले नाही. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ धावपळ करू लागल्या. नंतर पूनमताईने मला जाणीव करून दिली, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी धावपळ करणे अपेक्षित नाही. तुम्हीच धावपळ करायला पाहिजे. त्यांचा गुडघा दुखतो. त्यांना त्रास होतो. तेव्हा आपणच पुढाकार घेऊन करायला हवे. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ दौर्यावरून आल्यावर पूनमताई त्यांना आवर्जून भेटते.
– कु. योगिता पालन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.२.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |