पू. (श्रीमती) विजया लोटलीकरआजी यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१९.२.२०२१ या दिवशी सनातनच्या संत पू. (श्रीमती) विजया लोटलीकरआजी यांच्या निधनानंतरचा १० वा दिवस आहे. त्या निमित्ताने…
१०.२.२०२१ या दिवशी पू. (श्रीमती) विजया लोटलीकरआजी यांनी देहत्याग केला. त्यांची सेवा करतांना, तसेच त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. श्री. विजय लोटलीकर (पू. आजींचा मोठा मुलगा), फोंडा, गोवा.
१ अ. पू. आजींची सेवा करतांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया आपोआपच होणे : वर्ष २०१९ मध्ये पू. आजींना संतपद प्राप्त झाले. त्या वेळी परात्पर गुरुदेव म्हणाले, पू. आजींची सेवा करा. त्यातूनच तुमची प्रगती होईल. तेव्हापासून मी त्यांची संत म्हणून सेवा करू लागलो. पू. आजींची सेवा करतांना माझी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया आपोआपच होत होती; कारण पुष्कळ वेळा पू. आजी जेवत नसत किंवा पाणी पित नसत, तेव्हा मला राग येत असे; पण लगेचच आठवण व्हायची की, आपण पू. आजींची सेवा आई म्हणून नाही, तर संतांची सेवा करत आहोत. हे लक्षात आल्यावर देवाची क्षमा मागून मी परत मनोभावे त्यांची सेवा करत असे.
१ आ. रुग्णाइत असूनही तोंडवळा प्रसन्न असणे : आक्टोबर २०२० मध्ये पू. आजी पडल्या. तेव्हापासून त्या अंथरूणाला खिळून होत्या. जेवण अल्प असूनही त्यांचा तोंडवळा प्रसन्न वाटत होता. ही केवळ गुरुदेवांची कृपाच आहे.
१ इ. पू. आजींना गोव्याला आणतांना देवाच्या कृपेने सर्व अडचणी सुटणे : नोव्हेंबर २०२० मध्ये आम्ही आजींना गोव्याला आणायचे, असे ठरवले. तेव्हा त्यांना कसे न्यायचे ? हा प्रश्न निर्माण झाला. पू. आजींना गोव्याला नेण्यासाठी रुग्णवाहिका (अॅम्बुलन्स) विचारल्या. तेव्हा एवढ्या लांब येऊ शकत नाही, असे काहींनी सांगितले. तेव्हा माझ्या पत्नीने (सौ. संगीता लोटलीकर यांनी) पू. जाधवकाकूंना विचारले, आपल्याला आश्रमातून साहाय्य मिळू शकते का ? त्यानंतर आश्रमातून संमती मिळाली आणि जाण्याचा मार्ग, चालक आणि वाहक यांची सोय झाली. यासंदर्भात पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी सुचवले, मार्गात असणार्या सर्व केंद्रांतील साधकांचे साहाय्य घेऊ शकतो. यावरून देव किती भरभरून देतो, हे लक्षात आले आणि कृतज्ञता व्यक्त झाली.
१ उ. कोणताही त्रास न होता प्रवास चांगला होणे : आम्ही पू. आजींना घेऊन गोव्याला निघालो. तेव्हा वाहने अल्प असल्यामुळे मार्ग मोकळा होता. त्यामुळे प्रवास चांगला झाला. १४ घंट्यांच्या प्रवासात पू. आजींनी जेमतेम १ पेला पेज घेतली. त्यांना कोणताही त्रास न होता प्रवास चांगला झाला. ही केवळ ईश्वराचीच कृपा !
१ ऊ. देवच त्यांचे सर्व काही करत आहे, हे लक्षात येणे : घरी आल्यापासून दोन ते अडीच मास पू. आजींना जेवण जात नव्हते. तेव्हा देवच त्यांचे सर्वकाही करत आहे, हे लक्षात आले. १०.२.२०२१ या दिवशी त्यांचा त्रास वाढल्याचे लक्षात आल्यावर त्यांना उशा ठेवून वर उठवूया, असे म्हणून मी त्यांना हातात घेतले आणि त्यांनी माझ्या हातावरच देह ठेवला. देवा, तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
२. सौ. संगीता लोटलीकर (पू. आजींची मोठी सून), फोंडा, गोवा.
२ अ. देहत्यागापूर्वी
२ अ १. परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र पाहून वेदना न्यून होणे : पू. आजींना त्रास व्हायचा, तरी परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र समोर ठेवले की, त्यांच्या तोंडवळ्यावरील वेदना न्यून व्हायच्या, असे लक्षात आले. परात्पर गुरुदेवांना त्या ओळखत होत्या, हे लक्षात यायचे.
२ अ २. पू. आजी ज्या खोलीत होत्या, तेथील खिडकीत लहान लहान चिमण्या येऊन मंजूळ स्वरात काहीतरी बोलत असत. आजींच्या जवळ सुळसुळ्या मुंग्या यायच्या आणि आपले लक्ष गेले की, त्या लगेच जायच्या.
२ अ ३. पक्षी, मुंग्या आणि तुळस यांनी संतांचे चैतन्य घेण्यासाठी प्रयत्न करणे : आजींच्या खोलीच्या खिडकीमध्ये माझ्या यजमानांनी फुलझाडे लावली होती. ती १५ दिवसांतच पुष्कळ वाढली. आश्रमातून आणलेली तुळस पुष्कळ उंच झाली. आजींच्या खोलीची ५ वेळा शुद्धी करायला सांगितली होती. जणूकाही शुद्धी करण्यासाठीच तुळशींची पाने मोठी झाली होती, असे वाटले. पक्षी, मुंग्या आणि तुळसही संतांचे चैतन्य घेण्यासाठी प्रयत्न करत होती. त्यामुळे कृतज्ञता वाटत होती.
२ अ ४. वाईट शक्तींशी सूक्ष्मातील युद्ध चालू असणे : एकदा मी पू. आजींना अंघोळ घातली. २ घंट्यांनी त्यांच्या अंगाला दुर्गंधी येऊ लागली. अंगावर जखमा नसतांनाही अंगाला दुर्गंधी येत आहे, हे मी पू. (सौ.) जाधवकाकूंना सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, वाईट शक्तींशी सूक्ष्मातील युद्ध चालू असेल; म्हणून दुर्गंधी येत आहे. त्यानंतर पुन्हा कधीही दुर्गंधी आली नाही. तेव्हा संतांना सांगितल्यावर त्यांच्या कृपेने अडचण सुटते, हे लक्षात आले आणि पुष्कळ कृतज्ञता वाटली.
२ आ. मृत्यूसमयी
१. १०.२.२०२१ या दिवशी मी त्यांच्या समोर होते. त्यांना ३ दिवस घरघर लागली होती. त्यासाठी आश्रमातील तीर्थ त्यांच्या मुखात घातले. ते ४ चमचे पोटात गेले.
२. यजमानांनी पू. आजींचे डोके उशीवर ठेवण्यासाठी हातात घेतले. डोके यजमानांच्या ओंजळीत असतांना पू. आजींचा प्राण गेला. तेव्हा प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. परात्पर गुरुदेवांनी पू. आजींचे प्रारब्ध संपवण्यासाठी १ मास वाढवून दिला, हे लक्षात आले. प.पू. गुरुदेव प्रत्येकालाच मुक्त करणार आहेत, हे लक्षात येऊन जय गुरुदेव हा नामजप चालू झाला.
२ इ. गुरुदेवांनी सगुण आणि निर्गुण दोन्ही सेवा करवून घेतल्याविषयी कृतज्ञता ! : फेब्रुवारी २०२० मध्ये मी रामनाथी आश्रमात आल्यावर संतांच्या भेटीत त्यांनी पू. आजींची चौकशी केली. तेव्हा ते म्हणाले, प्रसार करत असतांना मासातून ३ – ४ दिवस येऊन पू. आजींची सेवा करा. त्यानंतर दळणवळण बंदीच्या काळात गुरुपौर्णिमेनंतर मला पू. आजींच्या सेवेची संधी मिळाली आणि गुरुदेवांनी ७ मास माझ्याकडून त्यांची सेवा करवून घेतली. ही केवळ प.पू. गुरुदेवांचीच कृपा आहे.
गुरुदेवांनी माझ्याकडून सगुण आणि निर्गुण दोन्ही सेवा करवून घेतल्याविषयी कृतज्ञता ! (११.२.२०२१)
३. श्री. विश्वास वि. लोटलीकर (पू. आजींचा मधला मुलगा), म्हार्दोळ, गोवा.
३ अ. देहत्यागानंतरही तोंडवळ्यावर तेज दिसणे आणि त्यांनी देहत्याग केला, असे न जाणवणे : पू. आजींच्या (आईच्या) देहत्यागानंतर त्यांच्या तोंडवळ्यावर तेज दिसत होते आणि त्या उघड्या डोळ्यांनी आमच्याकडे पहात आहेत, त्यांची जीभ आणि डोळे हालत आहेत, असे जाणवत होते. त्या आमच्याशी बोलतांना नामजप करत आहेत आणि साधनेत प्रगती करा, असा आशीर्वाद देत आहेत, असे जाणवत होते. त्यांनी देहत्याग केला, असे जाणवतच नव्हते.
३ आ. देहत्यागानंतर १० घंटे होऊनही पू. आजींच्या तोंडवळ्यावर आनंद आणि चैतन्य जाणवत होते. त्यांना नमस्कार करतांना त्यांच्या पायातून सात्त्विक लहरी येत आहेत, असे जाणवत होते.
३ इ. परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवणे : त्या परात्पर गुरु डॉक्टरांशी बोलत आहेत, असे जाणवत होते आणि तेथे गुरुदेवांच्या अस्तित्वाची जाणीव होत होती.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने पू. आजींना सद्गती मिळाली आहे, असे वाटून कृतज्ञता वाटली. केवळ आईच्या आशीर्वादानेच आम्ही साधनेत आलो यासाठी कृतज्ञता ! गुरुदेव, कोटीशः कृतज्ञ आहे.
४. सौ. माधवी वि. लोटलीकर (पू. आजींची मधली सून)
अ. पू. आजींची देवावर नितांत श्रद्धा होती. त्या आम्हाला देवाचा उत्सव कोणत्या मासात आहे, देवाला कोणते नैवेद्य दाखवायचे, हे न चुकता सांगत असत.
आ. पू. आजींनी देहत्याग केल्यावर त्या शांत झोपल्या आहेत, असे जाणवत होते. दत्ताचा नामजप सतत चालू होता. मन निर्विचार होते आणि वातावरण चैतन्यमय जाणवत होते.
५. श्री. विलास लोटलीकर आणि सौ. स्नेहा विलास लोटलीकर (धाकटा मुलगा आणि सून), कणकवली
अ. पू. आजींच्या आध्यात्मिक संस्कारांमुळे संपूर्ण लोटलीकर कुटुंब गुरुदेवांच्या मार्गदर्शनानुसार सेवा आणि साधना करत आहे, हे आमचे परम भाग्य आहे. त्यांच्यातील शिस्त, कुटुंबातील जिव्हाळा आणि इतरांचा विचार करणे, या गुणांमुळे आम्ही पुष्कळ काही शिकलो आहोत.
आ. त्यांच्या देहत्यागानंतर आम्हाला आध्यात्मिक आधार गमावला, असे जाणवते. पू. आजींच्या चरणी शतशः नमन !
६. सौ. मुक्ता अभिनय लोटलीकर (नात सून) आणि श्री. अभिनय विश्वास लोटलीकर (नातू), फोंडा, गोवा.
६ अ. प्रेमळ : पू. (श्रीमती) विजया लोटलीकरआजी, म्हणजे संपूर्ण लोटलीकर कुटुंबियांना जोडून ठेवणारा कणाच होता. पू आजींना सर्वांविषयी अत्याधिक प्रेम होते.
६ आ. देहत्यागांतर
६ आ १. खोलीत गेल्यावर आपोआप नामजप चालू होणे : पू. आजींनी देहत्याग केला असला, तरी त्या शांत झोपल्या आहेत, असेच जाणवत होते. पू. आजींच्या खोलीत गेल्यावर आपोआप नामजप चालू होत होता. संतांनी देहत्याग केल्यावर वातावरणात चैतन्यच प्रक्षेपित होत असते, हे पू. आजींच्या खोलीत गेल्यावर लक्षात आले.
६ आ २. पू. आजींच्या देहाजवळ चादर व्यवस्थित करायला गेल्यावर जांभया येऊन माझ्यावरील त्रासदायक आवरण निघाले. (११.२.२०२१)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |