सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गात वाढ
सातारा, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ते फेब्रुवारीच्या दुसर्या आठवड्यात जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे दायित्व वाढले असून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
नागरिकांना कोरोना गेला, असे वाटत आहे. त्यामुळे मास्क न लावणे, सामाजिक अंतर न पाळणे याचे प्रमाण वाढले आहे. लग्न समारंभ आणि इतर गर्दीतही लोक मास्क न लावता सहभागी होत आहेत. दुकानातही खरेदीसाठी लोकांची झुंबड उडालेली पहायला मिळते. जानेवारीत रुग्णसंख्येचा दर २-३ पर्यंत खाली आला होता; मात्र तो पुन्हा १०० च्या घरात जाऊन पोचला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ५७ सहस्र ६७१ पर्यंत पोचली आहे. ९८० रुग्ण सध्या उपचार घेत आहेत, तर १ सहस्र ८४३ जणांनी जीव गमावला आहे.