रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यानंतर पू. गुरुनाथ दाभोलकर यांनी अनुभवलेले अनमोल भावक्षण !
माघ शुक्ल पक्ष सप्तमी (रथसप्तमी, १९.२.२०२१) या दिवशी सनातनचे संत पू. गुरुनाथ दाभोलकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी रामनाथी आश्रमातील भेटीत अनुभवलेले अनमोल भावक्षण येथे दिले आहेत.
पू. गुरुनाथ दाभोलकर यांच्या चरणी सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. भूवैकुंठ असलेल्या रामनाथी आश्रमात जाण्याचा योग ३ वर्षांनी येणे
मला बर्याच काळानंतर वैकुंठरूपी सनातनच्या रामनाथी आश्रमात जाण्याची संधी श्री. अतुल पवार यांच्यामुळे लाभली. मला पुष्कळ वेळा रामनाथी आश्रमात जाण्याची इच्छा होत होती; पण तो योग येत नव्हता. श्री. अतुलदादा त्यांचे चारचाकी वाहन घेऊन रामनाथी येथे जायला निघाले होते. त्यामुळे मला संधी मिळाली. आम्ही रात्री १० वाजता रामनाथी आश्रमात पोचलो. माझे एकूण ६ दिवस वैकुंठरूपी आश्रमात वास्तव्य होते.
२. भूवैकुंठ असलेल्या रामनाथी आश्रमाचे दर्शन घेतांना पुष्कळ चैतन्य जाणवणे आणि मन भरून येणे
दुसर्या दिवशी सकाळच्या विश्रांतीनंतर एका विनम्र साधिकेसमवेत मी आश्रम पहायला गेलो. मला आश्रमात फिरतांना जागोजागी चैतन्य जाणवत होते. आश्रमात विविध ठिकाणी वेगवेगळ्या सेवा करणार्या साधकांचे हसरे आणि आनंदी तोंडवळे पाहून, तसेच परिचित अन् नवागत यांना भेटतांनाही मला एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळत होते. आश्रमाच्या प्रांगणात प्रतिष्ठापित केलेल्या देवतांची स्थाने पाहून माझे मन अतिशय भरून आले होते.
३. परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत अनुभवलेले काही त्रासदायक आणि काही चांगले पालट !
दुसर्या दिवशी मी परात्पर गुरुदेवांच्या खोलीत झालेले आध्यात्मिक पालट आणि काही दृश्ये पाहिली.
३ अ. त्रासदायक पालट
१. परात्पर गुरुदेवांच्या खोलीच्या भिंतींवर विशिष्ट प्रकारचे भेसूर तोंडवळे, काही ठिकाणी हातांचे पंजे उमटलेले आणि पापुद्रे दिसले.
२. त्यांच्या खोलीतील देवघरात असलेल्या कुलदेव आणि अन्य देवता यांच्या चित्रांवर पापुद्रे दिसत होते.
३. परात्पर गुरुदेवांच्या लिखाणाच्या पटलावर काळे डाग पडले होते.
३ आ. चांगले पालट
१. मी खोलीत प्रवेश केल्यावर मला जणू मी ढगात आहे, असे जाणवले.
२. वातावरणात नीरव शांतता जाणवत होती.
३. खोलीची परिमिती (डायमेन्शन) वाढल्यासारखी जाणवली.
४. आरशामध्ये आपतत्त्व जागृत झाल्याचे जाणवत होते. ती काच नसून जललाटाच पसरत आहेत, असे दिसत होते.
५. स्नानगृहातील पाण्यात खळखळाट जाणवत होता.
६. खोलीतून आवारातील झाडे अधिक टवटवीत दिसत होती. कपाटाच्या आरशात दिसणारे झाडांचे प्रतिबिंब अधिक तजेलदार दिसत होते.
७. त्यांच्या पटलाखाली सप्तरंगी छाया दिसत होती.
४. भारतीय संगीत आणि पाश्चात्त्य संगीत यांचा साधकांवर होणार्या परिणामांचा प्रयोग पहाणे
त्यानंतर मी साधकांना कशा प्रकारे आध्यात्मिक त्रास होतो याविषयीच्या ध्वनीचित्र-चकत्या पाहिल्या. एका साधकाने असा त्रास होणार्या साधकांसाठी सलग २ दिवस घेतलेला पाश्चात्त्य संगीत आणि भारतीय संगीत यांचा प्रयोग अन् त्यामुळे त्रास असलेल्या साधकांवर होत असलेले परिणाम अनुभवता आले.
५. विदेशी साधकांचा अनुभवलेला कृतज्ञताभाव !
आश्रमात काही विदेशी साधक उपस्थित होते. त्या साधकांना भेटतांना त्या प्रत्येकासमोर माझा भाव जागृत होत होता. त्यांनी मला केलेला नमस्कार एकदम काळजाला जाऊन भिडत होता. त्यांचे तोंडवळे अतीव आनंदात असल्याचे दिसत होते. आपण जीवनात जे काही हरवत चाललो होतो, ते परात्पर गुरुमाऊलींच्या कृपेने आपल्याला मिळाले आहे. त्यांनी आपल्याला नवजीवन दिलेले आहे, याविषयीची अवर्णनीय कृतज्ञता त्यांच्या तोंडवळ्यावर जाणवत होती. भाषेच्या अडचणीमुळे माझे त्यांच्याशी मुक्त संभाषण झाले नाही; पण त्यांच्या त्या भावपूर्ण आणि श्रद्धापूर्ण कृतींतून मला सारे काही उमजून गेले.
५ अ. विदेशी साधकांचा भाव आणि साधनेची तळमळ पाहून परात्पर गुरुदेवांनी पूर्वी सांगितलेल्या वचनाची आठवण होणे : मी भारावलेल्या स्थितीत सद्गदित मनाने तेथून बाहेर पडलो. माझ्या मनात विचार आला, काही वर्षांनंतर विदेशी साधकांची संख्या वाढून आश्रमही आपल्याला अल्प पडेल. मी हा विचार संतांजवळ बोलून दाखवला. तेव्हा ते म्हणाले, अहो, काही वर्षांनंतर कशाला, आताच अनेक विदेशी साधक इकडे येण्यासाठी सिद्ध आहेत; पण आपल्याकडे जागा कुठे आहे ? आपण जागेच्या शोधात आहोत. लवकरच आपल्याला मोठी जागा मिळेल. देव साहाय्य करतच आहे. हे सर्व ऐकल्यानंतर परात्पर गुरुदेव वर्ष १९९७ मध्ये जेव्हा सिंधुदुर्ग येथे मोठ्या सभेसाठी आले होते, तेव्हाचा प्रसंग मला आठवला. त्या सभेनंतर दुसर्या दिवशी त्यांनी जिल्ह्यातील साधकांचा सत्संग घेतला होता. तेव्हा ते म्हणाले होते, लक्षात घ्या. आताचा काळ साधनेला पूरक आहे. काय साधायचे, ते आताच साधून घ्या. नाहीतर, पुढे विदेशी साधक येऊन तुम्हाला अध्यात्म शिकवतील. त्यांच्या या सत्यवाणीची मी प्रचीती घेतली.
६. आश्चर्यचकित आणि सद्गदित करणारी गुरुमाऊलीची अकस्मात् झालेली भेट !
६ अ. छायाचित्र काढण्यासाठी सिद्ध होण्याचा निरोप मिळणे : मी आश्रमात गेल्याच्या पाचव्या दिवशी संध्याकाळी तुमचे छायाचित्र काढायचे आहे. त्यासाठी तुमच्याकडे असलेले सदरे बाहेर काढून ठेवा. साधक येऊन योग्य त्या रंगाचा सदरा निवडतील, असा निरोप मला मिळाला. मी ठरलेल्या वेळी त्यांनी निवडलेला सदरा परिधान करून सिद्ध झालो. त्याच वेळी एक साधिका मला बोलवायला आली आणि छायाचित्र काढण्यासाठी मला एका कक्षात घेऊन गेली. तेथे २ साधक आणि एक साधिका छायाचित्रकासहित सज्ज होते. त्यांनी मला आसंदीत बसवून छायाचित्रासाठी अपेक्षित स्थितीत सिद्ध केले. ते तिघेही छायाचित्रकाच्या स्टँडजवळ स्तब्ध उभे राहून माझ्याकडे पहात होते.
६ आ. छायाचित्र न काढता साधक दाराकडे का पहात आहेत ?, असे वाटणे, त्याच क्षणी अकस्मात्पणे दारातून आराध्य दैवत गुरुमाऊलीचा प्रवेश होणे : त्या साधकांची दृष्टी मधून-मधून कक्षाच्या दाराकडे जात होती. तेव्हा यांनी मला छायाचित्रासाठी सिद्ध करून बसवले आहे, तरीही ते माझे छायाचित्र का घेत नाहीत ?, असा विचार माझ्या मनात आला. मला काही कळेना. काहीही असो, असा विचार करून मी शांत बसलो. काही क्षणांत त्यांची दृष्टी पुन्हा दाराकडे गेली आणि ते एकदम सज्ज झाले; म्हणून मी दाराकडे पहातो, तर काय ? प्रत्यक्ष गुरुमाऊली, आपल्या सर्वांचेच दैवत, खोलीत प्रवेश करत आहे. मी थोडासा बावरलोच. परात्पर गुरुदेव समोर येताच नमस्कार घडले. ते माझ्याजवळ येऊन मला म्हणाले, हे बघा, माझ्याजवळ तुमचे छायाचित्र नाही. दोघांचेही एकत्रित छायाचित्र काढावे, असे मला वाटले; म्हणून तुम्हाला बोलावले. मला तुमची आठवण येईल, तेव्हा मी त्या छायाचित्राकडे पहात राहीन, चालेल ना ? मी त्यांचे बोलणे ऐकून सद्गदित झालो.
६ इ. विविध प्रकारची छायाचित्रे काढली जाणे : आमची दोघांची एकत्रितपणे विविध छायाचित्रे घेतली गेली. एकदा आम्ही दोघे छायाचित्रकासमोर एकत्रित राहून, दोघे आसंदीत बसून बोलत आहोत, अशी विविध छायाचित्रे घेतली. त्यानंतर त्यांच्या हातून मला प्रसाद देतांनाचे छायाचित्र काढले. यानंतर छायाचित्र काढण्याचा कार्यक्रम संपला. त्यांनी उपस्थित साधकांना त्यांच्या सेवेसाठी जायला सांगितले आणि मला साधनेसंदर्भात पुढील मार्गदर्शन केले. त्यांनी साधक जातांना साधकांना आवश्यक तेवढाच पंखा आणि दिवा ठेवण्यास सांगून अन्य बंद करून जाण्यास सांगितले. ते त्यांना म्हणाले, यांचे काय ? हे काही अधिक बोलणार नाहीत. ५ – ७ मिनिटेच बोलतील.
७. नर्मदेच्या तिरी राहून साधना करणारे साधू-संत फार दुःखी असणे; कारण त्यांनी साधना करून जे कमावले, ते घ्यायला कुणीही नसणे, हे परात्पर गुरुदेवांचे शब्द आठवणे
पूर्वी एकदा परात्पर गुरुदेव सिंधुदुर्गात आले असतांना त्यांनी केलेले एक वक्तव्य मला आठवले, आज साधनेसाठी काळ अत्यंत अनुकूल आहे. कलियुगात साधना करणे सोपे आहे. साधना वाढवा, मिळेल ते पदरात घ्या. येणारा काळ भयंकर कठीण आहे. त्यातून तरण्यासाठी साधनाच आवश्यक आहे. जो हे साधेल, तोच तरेल ! आज नर्मदेकाठी तपस्यारत असलेले सहस्रो साधू-संत दुःखी आहेत. का ? तर ते म्हणतात, आम्ही जे मिळवले, ते आमच्याकडून घेणारा कुणीच नाही. जे आम्ही मिळवले, ते आमच्यासमवेतच नाश पावणार. तेव्हा विचार करा, काळ फार अल्प आहे. मी हे जेव्हा त्यांना सांगितले, तेव्हा ते म्हणाले, हे पण तुम्हाला आठवते का ? वाः ! छान.
अशा प्रकारे परात्पर गुरुमाऊलींच्या चरणांशी बसून त्यांची अमृतवाणी मला ग्रहण करता आली.
असा ६ दिवसांच्या रामनाथी आश्रमातील वास्तव्यात मला एकदा गुरुमाऊलीच्या भेटीचा अनमोल सत्संग लाभला. त्यांच्या चरणी कोटीशः नमस्कार !
– (पू.) श्री. गुरुनाथ दाभोलकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
|